

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सात विविध कार्यकारी सहकारी संस्थांना पुढील आदेश येईपर्यंत या वर्षी पीक कर्ज वाटप करू नये, असे स्पष्ट आदेश नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी अधिकारी यांनी निफाडच्या विभागीय अधिकार्यांना दिले आहेत. दरम्यान, जिल्हा बँकेने या सात संस्थांना कर्जवाटप केल्यास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर जिल्हा बँकेच्या ठेवीदारांसह बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. बाजार समित्यांसाठी विकास संस्था संचालकांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे सोसायटी निवडणुकीत आपल्या गटाचे अधिकाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच नवीन विकास संस्थांची स्थापना केल्या जात आहेत. निफाड तालुक्यात चांदोरी, तारुखेडले, खाणगाव थडी, करंजगाव, पिंपळगाव बसवंत, पालखेड व नैताळे येथे सात नवीन विकास संस्था मागील वर्षी स्थापन करण्यात आल्या. या संस्थांमध्ये सदस्य करून घेताना अनेकांनी जुन्या संस्थांमधील कर्ज भरणा केला नाही. तसेच एकाच जमिनीवर एकाच कुटुंबातील सदस्यांना दोन ठिकाणी पीककर्ज घेतल्याच्याही तक्रारी अनिल कदम यांनी केल्या होत्या. या तक्रारींनंतर कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या पत्रानुसार जिल्हा बँकेने या पीककर्जाची चौकशी तसेच या सात विकास संस्था स्थापन करताना झालेल्या अनियमिततेची चौकशी करून अहवाल देण्यात आला. या अहवालाने अनिल कदम यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी एक दिवसाचे उपोषणही केले होते.
दरम्यान, जिल्हा बँकेने या आर्थिक वर्षात विकास संस्थांना कर्जपुरवठा करण्यासाठी कर्जमर्यादा पत्रक तयार करून निफाड तालुक्यातील त्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या संस्थांना कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे मुख्यमंत्री असूनही आपल्या मागणीला न्याय मिळत नसल्याचे बघून, अनिल कदम यांनी या सात संस्थांबाबत नाबार्डला पत्र लिहिले, सहकारमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिला. तसेच जिल्हा बँकेचे प्रशासक कदम यांच्या दालनात जाऊन गोंधळ घातला. त्याचबरोबर उच्च न्यायालयात या सात संस्थांना कर्जपुरवठा करण्यातील अनियमितता लक्षात आणून दिली. त्यामुळे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार विभागाला कळवून कर्ज मंजूर पत्रकाच्या यादीतून या संस्था वगळण्याचा आदेश देऊन कर्जपुरवठा करू नये, अशा सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हा बँकेचे कार्यकारी अधिकारी यांनी निफाडच्या विभागीय अधिकार्यांना पत्र देऊन पुढील आदेश येईपर्यंत या संस्थांना कर्जपुरवठा न करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. पिंपळगाव बाजार समितीमध्ये दिलीप बनकर यांची 2000 पासून सत्ता असून, मागील निवडणुकीत अनिल कदम व बनकर यांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे अनिल कदम यांनी पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या निवडणुकीची पूर्ण तयारी त्यांनी केली आहे.
या आहेत सात विकास संस्था
चांदोरी विकास संस्था, मूळ मुकाई विकास संस्था, तारुखेडले, सप्तशृंगी विकास संस्था, खानगाव थडी, छत्रपती शिवाजी महाराज विकास संस्था, करंजगाव, सप्तशृंगी महिला विकास संस्था, पिंपळगाव बसवंत, स्व. शंकरराव शिंदे विकास संस्था, पालखेड, मतोबा महाराज विकास संस्था