Nashik : हनुमान जन्मस्थळाबाबतचा गोविंदानंद यांचा दावा चुकीचा, त्र्यंबकेश्वरसह अंजनेरी पंचक्रोशीत संतप्त भावना | पुढारी

Nashik : हनुमान जन्मस्थळाबाबतचा गोविंदानंद यांचा दावा चुकीचा, त्र्यंबकेश्वरसह अंजनेरी पंचक्रोशीत संतप्त भावना

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
कर्नाटकमधील किष्किंधा ही नगरी हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दाखला गोविंदानंद सरस्वती देत आहेत. मात्र त्यांचा हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे मत येथील आखाड्यांचे साधू-महंत तसेच अंजनेरी व मुळेगावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. कर्नाटक राज्यातील स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांशी संपर्क साधून अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नसल्याचा दावा केला. त्यासाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला. मात्र त्यांच्या या विवादास्पद वक्तव्याने त्र्यंबकेश्वरसह अंजनेरी पंचक्रोशीत संतप्त भावना व्यक्त झाल्या आहेत.

अंजनेरी आणि मुळेगाव येथील ग्रामस्थ तसेच श्रीराम शक्तिपीठाधिश्वर महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, अटल आखाड्याचे महंत उदयगिरी महाराज, जुना आखाड्याचे महंत पिनाकेश्वर महाराज, आवाहन आखाड्याचे महंत ब्रम्हगिरी महाराज, श्रीनाथानंद, सच्चिदानंद महाराज यांच्यासह साधू-महंतांनी त्र्यंबकेश्वर मंदिराचे समोर येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अंजनेरीचे युवा नेते राजेंद्र बदादे, गणेश चव्हाण, संजय चव्हाण, राजराम चव्हाण, कमळू कडाळी यांच्यासह मुळेगावचे नामदेव भगत, देवराम भस्मे आदी उपस्थित होते.

महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज यांनी पद्मपुराण, शिवपुराण, स्कंधपुराण आदी विविध धर्मग्रंथांत त्र्यंबकेश्वर, ब्रम्हगिरी आणि अंजनेरी असा एकत्रित उल्लेख आढळतो. त्यामुळे अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे सिद्ध करण्याची आवश्यकताच नाही. ते अनादी कालापासून आहेच, यावर जोर दिला. महंत उदयगिरी महाराज यांनी, अंजनीमातेने अंजनेरी पर्वतावर हनुमानास जन्म दिला, तो साक्षात शिवाचा अंश आहे, याबाबत श्लोकांचा आधार दिला. महंत पिनाकेश्वर महाराज यांनी तर 9 धर्मग्रंथ येथे आणले होते. त्यामध्ये त्यांनी अंजनेरी पर्वतावर हनुमान जन्मस्थान असल्याचे आणि मुळेगावच्या बाजूस कुशेगावसह असलेला परिसर किष्किंधा असल्याचे सांगितले. यावेळी महंत ब्रम्हगिरी  महाराज यांनी, आपण केलेली साधना अभ्यासावर आधारित आहे. अंजनेरी येथे बाल हनुमान आणि अंजनीमातेचे मंदिर असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, मुळेगावचे नामदेव भगत यांनी भिलमाळ, गौतमऋषी, अहिल्या यासह प्रभू रामचंद्राच्या पाऊलखुणा दाखविणारे विविध दाखले या परिसरात आहेत, याबाबत माहिती दिली. अंजनेरीचे गणेश चव्हाण यांनी येथील स्थान माहात्म्य कमी करणे, परिसरात असंतोष निर्माण करणे आणि भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचवणे, अशा प्रकारची वक्तव्ये गोविंदानंद करीत असल्याने आपण अंजनेरी ग्रामस्थांच्या वतीने त्र्यंबक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवत असल्याचे स्पष्ट केले. त्र्यंबकेश्वर येथील सर्व आखाड्यांचे साधू-महंत यांनी हजारो वर्षांपासून अंजनेरीसह धर्मस्थळांचा पुराणांमध्ये उल्लेख झालेला असताना, तो खोडून काढण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याच सोबत गोविंदानंद यांच्या वक्तव्यास नाहक महत्त्व देण्याचीदेखील आवश्यकता नाही, असेदेखील काही साधूंनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

Back to top button