

नाशिक (दिंडोरी): पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील वनपरिसरात डोंगरांना वनवा लागण्याच्या घटनांचे सत्र थांबता थांबेना. येथे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वनव्यांच्या घटना बघायला मिळत आहेत. दिंडोरी जवळील वनपरिक्षेत्रात शनिवारी (दि.२८) दुपारी बाराच्या सुमारास लागलेल्या न्याहरी माता डोंगराला अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली. मात्र बहुउद्देशीय संस्थेच्या मदतीमुळे त्वरीत वनवा विझविण्यात यश मिळाले आहे.
गेल्या पाच-सहा वर्षापासून कार्यरत असलेले स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या न्याहरी माता डोंगर परिसरात वृक्षारोपण व संगोपनाचे काम करत आहे. या परिसरात वनवा लागला असल्याचे नजरेस पडताच नागरिकांनी संस्थेतील सदस्यांना फोनवरून त्वरीत संपर्क साधला. घटनेची माहिती माहिती मिळताच संस्थेचे सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. तसेच बरोबर आणलेल्या ओल्या बारदानांच्या गोण्या घेऊन वनवा विजवण्यासाठी पुढे सरसावली. तप्त उन, वाऱ्याचा वेग व त्यातल्या त्यात वाढलेल्या गवतामुळे अग्निच्या ज्वालांचा मोठा लोळ उठत होता. अखेर अथक प्रयत्नाने कडेकपारीत व निसरड्या जागेतही घुसून मोठ्या शिताफीने हा वनवा विझवण्यात आला आहे. तापलेली जमिन, मोठ्या प्रमाणातील धुराचे लोट व वाढलेल्या तापमानामुळे आग विझवणा-यांचा जिव कासाविस झाला होता. याबाबत वनविभागाला तातडीने माहिती दिल्याने वनविभाग दिंडोरी वनपाल अशोक काळे यांनी घटनास्थळी धाव घेत वनवा विझविण्यास मदत केली. त्यानंतर घटनेची पाहणी करून झालेल्या वन व जीवित हानीची पहाणी करत नोंद करण्यात आली. वनवा विझवल्यानंतर संस्थेकडून परिसरातील नागरिकांना घटनेचे गांभीर्य व त्यांचे भविष्यातिल दुष्परिणामावर माहिती देण्यात आली. भाऊसाहेब चव्हाणके, प्रविण भेरे, प्रविण घोलप, सजन फलाने, अमोल शिरसाठ, रोशन संधान, जगदिश गायकर, विक्रम गायकवाड, चिंधु वागले, खुशी खासाडे, कल्पना वागले आदींच्या सहकायाने आग विझवण्यात आल्याने त्यांच्या धाडसी कार्याचे कौतुक करत शाबासकीची थाप देण्यात आली.