गुडाळ ; पुढारी वृत्तसेवा राधानगरी धरणातून भोगावती नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथे आज (रविवार) सकाळी ९ वाजता घडली. सई नामदेव चौगुले (वय १०) असे या मुलीचे नाव असून, ती गावातील प्राथमिक शाळेत तिसरीमध्ये शिकत होती. दरम्यान, नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे तिच्या सोबत असणार्या तनुजा राजाराम चौगुले (वय 13) ही बचावली.
रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सकाळी सई आणि तनुजा घरातील महिलांसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. गेल्या चार – पाच दिवसांपासून धरणातून पाण्याचा प्रवाह बंद असल्याने नदी पात्रातील पाणी कमी झालेले होते. त्यामुळे या मुली पात्रातील कमी पाण्यात पोहत होत्या. राधानगरी धरणातून आज सकाळी पाणी सोडण्यात आले होते. अचानक आलेल्या वेगवान प्रवाहात या दोघी वाहू लागल्या. दोघीपैकी तनुजा कशीबशी पोहत काठाकडे आल्यावर महिलांनी तिला ओढून बाहेर घेतले. मात्र सई पाण्यात बुडाली.
दुर्दैवाने यावेळी अन्य मुले किंवा पुरुष नदीकाठी नव्हते. महिलांनी आरडाओरडा केल्यावर तिथे धाव घेतलेल्या लोकांनी नदीत उड्या मारून तिला पाण्याबाहेर काढले. सई बेशुद्ध झाली होती. तिला तत्काळ राधानगरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सईचा मृतदेह तिच्या घरी आणल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी आणि मोठ्या बहिणीने केलेला आक्रोशामुळे उपस्थित हेलावले.
कोल्हापुरात खासगी नोकरी करत असलेल्या नामदेव भिकाजी चौगले यांची छोटी कन्या असलेली सई हरहुन्नरी आणि हुशार असल्याने गल्लीत सर्वांची लाडकी होती. तिच्याअपघाती मृत्यूने गावात शाेककळा पसरली आहे. आजच सकाळी दहा वाजता गावात पालकमंत्री ना. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत एका पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम साजरा होणार होता. हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
हे ही वाचलंत का?