नाशिक : पावणेदोनशे अपहृत, बेपत्तांचा शोध | पुढारी

नाशिक : पावणेदोनशे अपहृत, बेपत्तांचा शोध

नाशिक : गौरव अहिरे
इंदिरानगर येथील 16 वर्षीय मुलीस तिच्या प्रियकरासह औरंगाबाद येथून ताब्यात घेत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने मुलीची सुखरूप सुटका केली. हा कक्ष कार्यान्वित झाल्यापासून शहरासह ग्रामीण व इतर जिल्ह्यांमधील 173 मुला-मुलींचा शोध घेण्यात आला आहे. त्यामुळे अल्पवयीन पाल्य त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप आले आहेत.

अठरा वर्षांखालील मुले-मुली बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत असतो. त्याचप्रमाणे अपहृत मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी ऑगस्ट 2017 मध्ये अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षातील अधिकारी व अंमलदार फक्त अपहृतांचा शोध घेत असल्याने काही तासांत किंवा दिवसांत अपहृत व अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यास मदत होत आहे.

या कक्षाच्या कामकाजास 2019 पासून प्रत्यक्षात सुरुवात झाली. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण व अपहृतांच्या नातलग किंवा मित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कक्षाने शोध घेत 173 अपहृतांचा शोध घेतला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळे सुमारे वर्षभर या कक्षाचे कामकाज थंडावले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा नव्या दमाने शोधमोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे पालकांनाही त्यांचे मुले-मुली सुखरूप मिळत असून, अपहरणकर्त्यांवरही कारवाई होत आहे.

बेपत्तांचा शोध :
या कक्षाने अपहृत मुला-मुलींसह शहरातील 15 सज्ञान पुरुष व महिलांचाही शोध घेतला आहे. त्यात अनेक जण प्रेमप्रकरण किंवा आर्थिक कारणावरून घर सोडून गेले होते. मात्र कक्षातील अधिकारी व अंमलदारांनी 15 जणांचा शोध घेतला आहे.

कक्षाने अपहृत व अपहरणकर्त्यांचा शेाध घेतल्यानंतर काही प्रकरणांमध्ये मुलींनी पोलिसांना कारवाई न करण्याचा आग्रह धरल्याचेही अनुभव आहेत. माझ्या मित्र, प्रियकरावर कारवाई करू नका, कारवाई करणार नसाल तरच मी सोबत येईल, असेही काही मुलींनी सांगून अपहरणकर्त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक प्रकरणांमध्ये अपहरणकर्त्यांनी मुलींवर अत्याचार केल्यानंतर मुलींनी त्यांच्या पालकांशी संपर्क साधून आपबीती सांगून सुटका केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.

अल्पवयीन मुली सर्वाधिक बळी
कक्षाने केलेल्या कारवाईत अवघ्या 13 ते 18 वयोगटातील मुली सोशल मीडियावरील ओळखीतून अपहरणकर्त्यांच्या आमिषाला बळी पडत असल्याचे समोर आले आहे. त्यातही अपहरणकर्त्याचे वय 25 ते 40 वयोगटातील असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button