Sangali : ''तुम्ही स्वप्न दाखवले वेगळे आणि दिवे लावले भलतेच...'' ‘समुद्रा’च्या प्रतिनिधींवर मनपा आयुक्त कडाडले | पुढारी

Sangali : ''तुम्ही स्वप्न दाखवले वेगळे आणि दिवे लावले भलतेच...'' ‘समुद्रा’च्या प्रतिनिधींवर मनपा आयुक्त कडाडले

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : ‘तुम्ही स्वप्न दाखवले वेगळे आणि दिवे लावले भलतेच. इथले नगरसेवक शांत आहेत, नाहीतर एलईडी आणून डोक्यात घातला असता. मी तुमच्या कामावर खूश नाही. सुधारणा न झाल्यास काहीतरी वेगळे होईल’, अशा शब्दात आयुक्त नितीन कापडणीस हे ‘समुद्रा’च्या प्रतिनिधींवर जोरदार बरसले. स्मार्ट एलईडी प्रकल्पास होत असलेला विलंब व महापालिका क्षेत्रातील अंधार यावरून नगरसेवकांना ‘समुद्रा’चे प्रतिनिधी व महापालिकेच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले.

आयुक्त नितीन कापडणीस, सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी, उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त तथा महापालिकेचे विद्युत विभाग प्रमुख अशोक कुंभार, विद्युत अभियंते अमर चव्हाण तसेच एलईडी प्रकल्प राबवणार्‍या समुद्रा कंपनीचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

कापडणीस म्हणाले, ‘एस्क्रो’चे कारण चालणार नाही. कर्जप्रकरण थांबल्याचे कारण देता तर मग बिडिंग कपॅसिटी कशी दाखविली? ‘एलईडी’चे काम संथगतीने सुरू आहे. सर्वेक्षण व दिवे बदलण्याची गती पाहता 40 हजार दिवे बदलायला दोन वर्षे लागतील. प्रशासनाने सूचना दिल्यानंतरही ‘समुद्रा’ने काही बाबींकडे दुर्लक्ष केलेले आहे. लाईट डिमिंग, प्रकल्प कंट्रोल रुम, तक्रार कक्ष, टोल फ्री नंबर सुरू नाही. फिटींगपर्यंतची वायर आणि बल्बसाठी ब्रॅकेट बसवून दिवे बदलावेत. बदललेले स्मार्ट एलईडी दिवे बंद पडले तर ते तातडीने बदला. नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी व समुद्राच्या प्रतिनिधींचे प्रभागनिहाय व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनवा. प्रभागात काम करण्यापूर्वी या ग्रुपवर माहिती आली पाहिजे. नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करा.

महापालिका क्षेत्रात बराच भाग तीन वर्षे अंधारात आहे. लोकांमध्ये संताप आहे. दुसरीकडे मात्र स्मार्ट एलईडी दिवे बसवण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. प्रथम अंधार असलेल्या भागातील दिवे न बसवता उजेडाने झळकत असलेल्या प्रमुख रस्त्यांवरच स्मार्ट एलईडी दिवे बसवले जात आहेत. नगरसेवकांनी विचारल्यावर स्मार्ट एलईडी दिवे उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते, पण दुसराच कोणीतरी येऊन दिवे बदलून सोशल मीडियावर चमकवून घेत आहे, हे सारे संताप आणणारे असल्याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले.

‘एलईडी’वरून होईल स्फोट

सभागृह नेते विनायक सिंहासने, नगरसेवक संतोष पाटील, योगेंद्र थोरात, वहिदा नायकवडी, विजय घाडगे, समाजकल्याण सभापती सुब्राव मद्रासी, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे-पाटील, संगीता खोत, अ‍ॅड. स्वाती शिंदे, फिरोज पठाण, गजानन मगदूम, उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, सविता मदने, संजय यमगर, कांचन कांबळे, स्वाती पारधी, नसींमा नाईक, अपर्णा कदम, लक्ष्मण नवलाई व नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. नगरसेवकांच्या मागण्या गांभिर्याने घ्या, अन्यथा स्फोट होईल. महासभेत मतदान घ्यावे लागेल, असा इशारा संतोष पाटील यांनी दिला.

डिसेंबर 2022 पर्यंत प्रकल्प पूर्ण केला जाईल. बंद बल्ब बदललले जातील. पूरपट्ट्यातील व एमआयडीसीत लप्राधान्याने स्मार्ट एलईडी दिवे बसवले जातील, असे ‘समुद्रा’च्या प्रतिनिधींनी सांगितले.

योगेंद्र थोरात – संगीता हारगे वाद

प्रभाग 20 मध्ये 534 दिवे कुठे कुठे बसवले? विस्तारित भागात अंधार असताना उजेड असह्य होत असलेल्या भागात एलईडी दिवे का बदलले, असे प्रश्न नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी उपस्थित केले. त्यावर 534 दिवे बदलल्याची माहिती बरोबर आहे, असे नगरसेवका संगीता हारगे यांनी सांगितले. त्यावरून थोरात व हारगे यांच्यात वादावादी सुरू झाली.

पगार मनपाचा; काम ‘समुद्रा’चे; आयुक्त संतापले

विद्युत विभागाकडील काही कर्मचारी ‘समुद्रा’कडे रोज 300 रुपयांवर काम करत आहेत. महापालिकेचा पगार घेऊन ‘समुद्रा’चे काम केल्याचे यापुढे आढळल्यास कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही आयुक्त कापडणीस यांनी दिला.

विरोधी पक्षनेते मेंढे यांचा ‘बैठकत्याग’

दुपारी तीन वाजता महापालिका मुख्यालयात बैठक होती, पण पावणेचार वाजेपर्यंत प्रमुख अधिकारी व पदाधिकारी सभागृहात नव्हते. त्यावरून विरोधी पक्षनेते संजय मेंढे, उत्तम साखळकर रागारागाने बैठकीतून गेले.

Back to top button