जोतिबा डोंगर; पुढारी वृत्तसेवा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या मंदिरात शुक्रवारी (दि.27) एक टन वजन असणारी महाघंटा येणार आहे. जोतिबा डोंगरावर घंटेला अतिमहत्त्व आहे. जोतिबा मंदिरात पश्चिम दरवाजावरती ऐतिहासिक घंटा आहे. जी चिमाजी अप्पा पेशवे यांनी एका युद्धात जिंकून आणली होती. ती कुलदैवत जोतिबा मंदिरात आहे. या घंटेवर मंदिरात अनेक वर्षे धार्मिक विधी पार पाडले जात होते.
यानंतर ही घंटादेखील भग्न झाली होती. 2000 साली या घंटेसाठी सांगली-पलूस येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे भक्त सर्जेराव नलवडे यांनी नूतन घंटा दिली. जी सध्या ग्वाल्हेर ट्रस्ट सिंधिया या ठिकाणी आहे. जोतिबा मंदिरातील धार्मिक विधी, मंगलसमयी तसेच गावामध्ये संकटकाळी एकत्र येण्यासाठी घंटानाद होत असतो. मंदिरातील नूतन घंटादेखील काही महिन्यांपूर्वी भग्न झाली होती. हे समजताच नलवडे यांनी पुन्हा घंटा देणार असल्याचे पुजार्यांना सांगितले.
नलवडे हे सांगलीतील मेटल उद्योगाचे कारखानदार आहेत. त्यांनी स्वतःचा व्यवसायदेखील 'केदार मेटल' या नावाने सुरू केला आहे. त्यांनी या घंटेची निर्मिती करताना जोतिबा डोंगरावरील पुजार्यांच्या हस्ते धार्मिक विधी करून सुरुवात केली. या घंटेची उंची 44 इंच आणि रुंदी पावणेचार फूट आहे. यामध्ये पंचधातू वापरले आहेत. या घंटेच्या निर्मितीसाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. शुक्रवारी या महाघंटेचे पूजन मंदिरात होणार आहे.