कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (ता. शिरोळ) ने सुरू केलेली विधवा प्रथा बंदीच्या चळवळ आता संपूर्ण राज्यात पोहोचू लागली आहे. जिल्ह्यातील सर्व गावांनी विधवा प्रथा बंदीचा ठराव ग्रामसभांमध्ये करावा यासाठी आता जिल्हा परिषद पुढे सरसावली आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हा ठराव करून घेण्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्याकरिता जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे लवकरच संपूर्ण जिल्ह्यात विधवा प्रथा बंदीचे सर्व ग्रामपंचायतींमध्ये ठराव होण्याची शक्यता आहे.
समाजातील अनिष्ट जुन्या रूढी, परंपरा समाज कितीही पुढारला तरी तो पूर्णपणे सोडण्यास अजूनही तयार नसल्याचे दिसून येते. समाजामध्ये विधवा महिलांना अजूनही दुय्यम स्थान दिले जाते. त्यांना मान, सन्मानांपासून बाजूला ठेवले जाते. मंगल कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. ही परिस्थिती बदलण्याकरिता थोर समाजसुधारकांनी देखील यापूर्वी प्रयत्न केले आहेत.
विधवा महिलांना मान, सन्मान मिळवून देण्यासाठी हेरवाड (ता. शिरोळ) मधील गावकर्यांनी विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. एका छोट्याशा गावाने घेतलेल्या या निर्णयाकडे केवळ जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. या निर्णयाची राज्य सरकारने दखल घेऊन राज्यातील सर्व गावांनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलावीत, असे परिपत्रक काढले. त्यानंतर विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव गावागावांत होऊ लागले.
जिल्ह्यातून सुरू झालेल्या चळवळीला गती देण्यासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यातील गावांमध्ये विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव ग्रामसभांमध्ये करावेत यासाठी ग्रामपंचायत विभागाच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठविण्याचे काम सुरू आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्व सर्व जिल्ह्यांतील सर्व ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा बंदीचे ठराव होण्याची शक्यता आहे.
विधवा प्रथा बंदचे ठराव करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे. ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. गावातील सरपंचांशी चर्चा सुरू आहे. शिवराज्याभिषेक दिनी दि. 6 जून रोजी ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायतींनाही ग्रामसभेची तयारी करण्यास वेळ मिळणार आहे.
– अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग