[toggle title="पुणे : पुढारी वृत्तसेवा" state="open"][/toggle]
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तांबे यांची गेल्याआठवड्यापूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. आयुर्वेद क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. याचबरोबर त्यांनी आयुर्वेदाशी संबंधित अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचं पुनर्जीवन केलं. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचं महत्वं घराघरात पोहचवलं. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गूण गृहिणींना समजावून सांगितले.
निरोगी, सुदृढ, आनंदी समाज आयुर्वेदाच्या माध्यमातून निर्माण करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं. बालाजी तांबे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
बालाजी तांबे यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारताच्या पारंपरिक आयुर्वेदिक उपचारपद्धतीला आधुनिक स्वरुप देऊन समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. आयुर्वेदाचं महत्वं सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अनेक लेख लिहीले. आयुर्वेदातील गुणकारी औषधं त्यांचा उपयोग याचं ज्ञान देशविदेशात पोहचवलं.
सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगितलं. आयुर्वेदाच्या समृद्ध परंपरेचा दस्तावेज तयार करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं आहे. त्यांनी निर्माण केलेल्या दस्तावेजातून भारतीय आयुर्वेदाचं ज्ञान, महत्वं भावी पिढ्यांसाठी चिरंतन राहणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी बालाजी तांबे यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं.