सातारा : गुरुजींच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा घाट | पुढारी

सातारा : गुरुजींच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा घाट

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी 12 व 24 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण केला आहे. अशा शिक्षकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण ऑनलाईन देण्याचा घाट घातला आहे. मात्र संबंधित विभागाने अद्यापही शिक्षकांना लिंक न दिल्याने प्रशिक्षण कधी सुरु होणार याकडे माध्यमिकसह प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पातळी वाढवणे व नापासाचे प्रमाण कमी करणे अशा विविध हेतूने निवडश्रेणी देण्यापूर्वी प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणास पात्र शिक्षकांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील पात्र शिक्षकांनी डिसेंबरमध्ये 2 हजार रुपये नोंदणी शुल्क भरले. त्यानंतर मे महिन्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ऑनलाईन लिंक देण्यात आली त्यामध्ये प्रशिक्षणार्थी शिक्षकांना माहिती भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षकांनी सविस्तर माहिती भरली.

शाळांना सुट्टी लागली असल्याने 15 मे नंतर ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाने शिक्षकांना सांगितले होते. त्यामुळे प्रशिक्षणास पात्र असलेल्या शिक्षकांनी सहलीसह अन्य विविध कार्यक्रमांचा बेत रद्द करत ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मात्र मे महिना संपत आला असूनही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने शिक्षकांना कोणतीही लिंक अद्यापही दिली नसल्याने प्रशिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. प्रशिक्षणासाठी 2 हजार रुपये शुल्क आकारल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे जमा झाला असतानाही प्रशासनाने प्रशिक्षणाबाबत अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही. शाळा सुरु होण्यापूर्वी तरी ऑनलाईन प्रशिक्षण होणार का? असा सवाल प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र असले तरी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रशिक्षण देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षक वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
– अन्यायग्रस्त शिक्षक

Back to top button