रत्नागिरी : लांजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लाखोंचा गैरव्यवहार | पुढारी

रत्नागिरी : लांजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लाखोंचा गैरव्यवहार

रत्नागिरी; भालचंद्र नाचणकर : लांजातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या लेखा विभागातील लाखो रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या विविध आर्थिक लाभांची रक्कम बनावट कागदपत्रे आणि सह्या करून हडपण्यात आली. या बाबतची प्रादेशिक कार्यालयाकडे तक्रार झाल्यानंतर चौकशीसाठी दोन समित्या नेमण्यात आल्या असून या प्रकरणी दोन वेळा संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली. यातून हा गैरव्यवहार पुढे आला आहे.

लांजातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील लेखा विभागातील एका कर्मचार्‍याला अन्य एका गुन्ह्याप्रकरणी अटक झाली. या पोलिस कारवाईमुळे त्या कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले. त्या नंतर निलंबित कर्मचार्‍याचा कार्यभार दुसर्‍या एका लिपिकाकडे देण्यात आला. एका निवृत्त कर्मचार्‍याला त्याच्या आर्थिक लाभाची रक्कम साडेतीन वर्षांपूर्वी अदा झाली. मात्र त्याच विषयाची रक्कम पुन्हा एकदा चालू वर्षात काढली गेल्याचे निदर्शनास आले. नव्याने कार्यभार पाहणार्‍या या लिपिकाने हा प्रकार प्राचार्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर चक्रे फिरून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रादेशिक कार्यालयाकडे या प्रकरणी तक्रार करण्यात आली.

प्रादेशिक कार्यालयाने तातडीने दखल घेत या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी दोन समित्यांचे गठण केले. या दोन्ही समित्यांनी लांजाला दोन वेळा भेट देवून आर्थिक व्यवहाराची तपासणी केली आहे. यामध्ये एका निवृत्त कर्मचार्‍याच्या निवृत्ती वेतनाची रक्कम काढण्याचे धनादेश देण्यात आल्याचे दिसून आले आहे. हीच रक्कम चार वर्षांपूर्वी अदा करण्यात आल्याचा तपशिल असून हेच देयक देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी नव्याने बनवण्यात आलेली कागदपत्र बनावट असून त्यावर असणार्‍या अधिकार्‍यांच्या सह्याही बनावट असल्याचे पुढे येत आहे.

लांजातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील असा एक गैरव्यवहार निदर्शनास आल्यानंतर सर्वच आर्थिक व्यवहारातील तपासणी केली जात आहे. लांजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यात प्राचार्यांकडे चार ते पाच तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे कार्यभार असल्याने त्यांची पळापळ होत असते. या घाईगडबडीतच बनावट कागदपत्रांवर सह्या घेवून आर्थिक गैरव्यवहार करण्याचा हेतू साध्य केला गेला असावा, असा तर्क लावला जात आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button