नाशिक : केतकीची भाषा आजची, परंपरा 1905 पासूनची – आ. कपिल पाटील | पुढारी

नाशिक : केतकीची भाषा आजची, परंपरा 1905 पासूनची - आ. कपिल पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हिंदू धर्मवादी व हिंदू राष्ट्रवादी यांच्यातील भेद ओळखण्यास आपण शिकले पाहिजे. महात्मा गांधींसह अनेक काँग्रेस नेते हिंदू धर्मवादी होते, पण त्यांचा हिंदू राष्ट्रवादाला विरोध होता. त्यांचा विरोध निरिश्वरवादी व्यक्तींना नाही, तर नास्तिकांना आहे. यामुळे केतकी चितळेची भाषा आताची असली तरी आपल्या विरोधकांवरील हल्ल्याची ही परंपरा ही 1905 पासूनची आहे, अशा शब्दांत आमदार कपिल पाटील यांनी हिंदू राष्ट्रवाद्यांवर टीकेची झोड उठवली.

सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात राष्ट्र सेवा दल व छात्रभारती यांनी आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे 101 वे पुष्प आमदार कपिल पाटील यांनी गुंफले.‘धोक्याचे भोंगे’ या विषयावर ते बोलत होते. आमदार पाटील यांनी प्रारंभी राज ठाकरे यांच्या भोंग्यांच्या भाषणानंतर पुण्यातील नास्तिक परिषद पुढे ढकलावी लागणे आणि शरद पवार हे आस्तिक असल्याचे पुरावे त्यांच्या कुटुंबीयांना दाखवावे लागले, हे संदर्भ देत हा लढा देव-धर्म मानणारे वा न मानणारे यांच्यातील नसून आस्तिक व नास्तिक यांच्यातील आहे.

वेदप्रामान्य मानणारे, पुनर्जन्म मानणारे, पूजापाठ करणारे, मंदिरात जाणारे, होमहवन करणारे आस्तिक असतात, तर हे न मानणारे निरिश्वरवादी व ईश्वरवादी हे दोन्हीही नास्तिक असतात, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे मंदिरांमध्ये न जाणारे महात्मा गांधी धार्मिक असूनही त्यांची हत्या केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या धर्माच्या विरोधात बोलणार्‍यांवर हल्ला करण्याची या मंडळींची परंपरा फार पूर्वीपासून असल्याचे सांगताना त्यांनी रामायण व महाभारतकालीन संदर्भ सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांचे अनुयायी विज्ञानवादी म्हणत असले तरी त्यांच्या साहित्यामधून ते वेद्प्रामान्य मानणारे असल्याचे दिसते. तसेच त्यांनी मनुस्मृतीचा गौरव केला होता, असा दावाही आमदार पाटील यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर तानाजी जायभावे, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र नाकील उपस्थित होते. सचिन मालेगावकर यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. शरद कोकाटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

ज्ञानवापीत आढळला तो कारंजा…
वाराणसीतील ज्ञानवापीमध्ये आढळलेला कारंजा आहे, ते शिवलिंग नाही. आपल्याकडे कोणताही दगड सापडला तरी त्याची पूजा केली जाते. वाजपेयींनी तर ‘कंकर कंकर में शंकर आहे’, असे म्हटले होते, अशा शब्दांत त्यांनी ज्ञानवापी मशिदीतील वादावर भाष्य केले. तसेच अयोध्येतही बाबरी मशिदीखाली उत्खनन केल्यानंतर सापडलेले सर्व पुरावे हे बौद्धांशी संबंधित असल्याचा दावा केला.

हेही वाचा :

Back to top button