प्रशांत किशोर म्हणाले, गुजरात, हिमाचलमध्ये काँग्रेसचा पराभव होणार | पुढारी

प्रशांत किशोर म्हणाले, गुजरात, हिमाचलमध्ये काँग्रेसचा पराभव होणार

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उदयपूरमध्ये पार पडलेले काँग्रेसचे चिंतन शिबिर अपयशी झाल्याचा दावा केला आहे. तसेच आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणार असल्याचे भविष्यही त्यांनी वर्तविले आहे.

किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला वारंवार उदयपूरमधील चिंतन शिबिरावर प्रतिक्रिया विचारली गेली. माझ्या मते या शिबिरातून जैसे थे स्थिती आणखी काळ वाढविण्यासाठी आणि काँग्रेस नेतृत्वाला आणखी वेळ देण्याशिवाय काहीही हाती लागलेले नाही. हे चिंतन शिबिर अपयशी ठरले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागेल. या दोन्ही राज्यांत याचवर्षी निवडणूक होणार आहे.

नुकतेच काँग्रेस प्रवेशावरून प्रशांत किशोर यांची दीर्घकाळ चाललेली चर्चा निष्फळ ठरली होती. त्यानंतर टीका करताना किशोर म्हणाले होते की, काँग्रेस दीर्घकाळ सत्तेत राहिली आहे. त्यांना विरोधी पक्षात कसे राहायचे असते ते कळत नाही. लोक स्वतःच हे सरकार उलथून टाकतील आणि काँग्रेसला सत्ता मिळेल, असे काँग्रेस नेत्यांना वाटते. किशोर यापूर्वी नितीशकुमार यांच्या संयुक्‍त जनता दल पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. काँगे्रसमध्ये प्रवेशात अपयश आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याचे म्हटले होते.

Back to top button