नाशिक : सतर्क राहून आपत्तीचे सूक्ष्म नियोजन करावे ; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन | पुढारी

नाशिक : सतर्क राहून आपत्तीचे सूक्ष्म नियोजन करावे ; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येणार्‍या मान्सून काळात संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, मालेगाव अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. गांगुर्डे, महानगरपालिकेचे मुख्य अभियंता एस. आर. वंजारी, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीनिवास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, राष्ट्रीय व राज्य आपत्ती निवारण दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले की, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मान्सून काळातील संभाव्य धोकादायक क्षेत्रांची पाहणी करून ते निश्चित करण्यात यावेत. त्यासाठी प्रत्येक गावनिहाय गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांचा गट तयार करून आपत्ती काळातील आवश्यक कामांची जबाबदारी यांच्यावर सोपविण्यात यावी. तसेच जलसंपदा विभागाने मान्सून काळात धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करताना सकाळी 8 नंतरच करावा. याबाबत संबंधित भागातील जनतेला सतर्कतेच्या सूचना यावेळेत देण्यासाठी नियोजन करावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक धरणनिहाय माहिती देण्यासाठी एक उपअभियंता यांची नेमणूक करावी. यासोबतच आपत्ती काळात सर्व संबंधित यंत्रणांनी आपल्या विभागाचे आपत्ती निवारण कक्ष अद्ययावत करून त्याठिकाणी प्रशिक्षित व अनुभवी अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करावी. आपत्ती कालावधीत झालेल्या नुकसानीची नागरिकांना वेळेत मदत मिळण्यासाठी तत्काळ पंचनामे करण्यासाठी अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

बैठकीच्या सुरुवातीला जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी जलसंपदा विभागामार्फत आपत्ती काळातील तयार करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देशपांडे यांनी संभाव्य आपत्तीच्या द़ृष्टीने तयार केलेल्या नियोजनाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

तालुकापातळीवरही व्यवस्था करावी
आपत्ती काळात नागरिकांना वेळेत मदत उपलब्ध होण्यासाठी सर्व यंत्रणांचे अद्ययावत संपर्क क्रमांक असलेली छोटी पुस्तिका जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत तयार करण्यात यावी. तसेच लाइफ जॅकेट, रबर बोट, 100 मीटर लांबीचा दोर, मेगा फोन व गावातील नागरिकांना सूचित करण्यासाठी भोंगे, सर्च लाइट अशा बचाव साहित्याची व्यवस्था तालुकापातळीवर करण्यात यावी. याप्रमाणेच शहरातील संभाव्य आपत्तीचे निवारण करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम, विद्युत, अग्निशमन दल या विभागांनी मान्सूनपूर्वीच नालेसफाई करून घ्यावी.

हेही वाचा :

Back to top button