नाशिक : जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापनांना मराठी नामफलक लावणे अनिवार्य, अधिनियम लागू | पुढारी

नाशिक : जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापनांना मराठी नामफलक लावणे अनिवार्य, अधिनियम लागू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करण्यासाठी नामफलक मराठी देवनागरी लिपीत लावण्याबाबतचा अधिनियम जारी करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावणे अनिवार्य असणार आहे, असे कामगार उपआयुक्त विकास माळी यांनी कळविले आहे.

राज्यातील सर्व व्यावसायिक दुकाने व आस्थापनेचे नामफलक मराठी भाषेत असण्याकरिता 17 मार्च 2022 रोजी शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली होती. यानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापनांना अधिनियम, 2017 च्या कलम 36 क-1 कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकाने व आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम 7 लागू आहे, त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक असणार आहे. तसेच या आस्थापनेच्या नियोक्त्यांकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक लावता येणार आहे.

त्याचबरोबर मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असून, मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या दुकाने व आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिता येणार नाहीत, अशी तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे.

या अधिसूचनेची जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही माळी यांनी केले आहे

हेही वाचा :

Back to top button