विमानतळावर स्निफर डॉग लावणार कोरोनाचा छडा? | पुढारी

विमानतळावर स्निफर डॉग लावणार कोरोनाचा छडा?

हेलसिंकी ः कुत्र्यांची घाणेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असतात व त्यामुळेच पोलिस दल किंवा सैन्यदलातही स्फोटके शोधण्यासाठी व अन्य कामांसाठी श्‍वान पथकाचा वापर केला जात असतो. आता मानवजातीचा शत्रू असलेल्या कोरोनाचा छडा लावण्यासाठीही श्‍वानांना प्रशिक्षण दिले जात आहे. अशा प्रशिक्षित स्निफर डॉग्जकडून विमानतळांवर प्रवाशांमधील कोरोना संक्रमणाचे निदान केले जाऊ शकते, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्‍त केले आहे.

अलीकडेच बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. फिनलँडच्या हेलसिंकी युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी महामारीच्या सुरुवातीला चार श्‍वानांना ‘कोव्हिड-19’ला कारणीभूत होणार्‍या ‘सार्स-कोव्ह-2’ या कोरोना विषाणूचा छडा लावण्यासाठी प्रशिक्षित केले होते. हे सर्व श्‍वान त्यापूर्वी अमली पदार्थ, धोकादायक उत्पादने व कर्करोगासारखा गंभीर आजारही केवळ वास घेऊन ओळखण्यात प्रशिक्षित झाले होते. असे स्निफर डॉग्ज कोरोनाचाही छडा लावू शकतात की नाही हे तपासण्यासाठी 420 लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यापैकी 114 लोक कोरोना पॉझिटिव्ह होते व 306 जण निगेटिव्ह.

श्‍वानांनी या सर्वांच्या स्कीन स्वॅब सॅम्पल्सचा सात वेळा वास घेतला. या पाहणीवेळी हे श्‍वान कोरोना संक्रमणाचा छडा लावण्यात 92 टक्क्यांपर्यंत यशस्वी झाल्याचे दिसून आले. संशोधकांनी सांगितले की 28 पॉझिटिव्ह सॅम्पल्स तर अशा रुग्णांचे होते ज्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. तरीही या श्‍वानांनी त्यांच्यामधील कोरोना संक्रमण ओळखले. या श्‍वानांनी केवळ एक पॉझिटिव्ह सॅम्पलला चुकून निगेटिव्ह ठरवले आणि दोन सॅम्पल्सचा वास घेतला नाही. याचा अर्थ त्यांनी 28 पैकी 25 सॅम्पल्सना अचूक ओळखले.

या पाहणीनंतर स्निफर डॉग्जची क्षमता हेलसिंकी-वांता इंटरनॅशनल एअरपोर्टवरही तपासण्यात आली. सात महिने सुरू राहिलेल्या या टेस्टमध्ये प्रवाशांचे पीसीआर सॅम्पल्सही घेण्यात आले. संशोधकांनी सांगितले की 98 टक्के प्रकरणांमध्ये स्निफर डॉग आणि पीसीआर टेस्टचे निष्कर्ष एकसारखेच होते! त्यामुळे विमानतळावर कोरोना तपासणीसाठी श्‍वान पहिल्या स्क्रिनिंगसाठी उपयोगात आणले जाऊ शकतात असे संशोधकांचे म्हणणे आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button