नाशिक : 20 हजारांची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षकासह अंमलदारास अटक | पुढारी

नाशिक : 20 हजारांची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षकासह अंमलदारास अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे शहरातील गुन्हे वाढत असताना दुसरीकडे दोन दिवसांत तीन लाचखोर पोलिस लाच मागताना व घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. बुधवारी (दि.18) भद्रकाली पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रणिता पवार यांच्यासह अंमलदार तुषार बैरागी यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.

काही दिवसांपूर्वी मनसेच्या फरार जिल्हाध्यक्षांना अटक केल्यानंतर प्रणिता पवार चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, बुधवारी (दि.18) सहायक पोलिस निरीक्षक प्रणिता दीपक पवार व पोलिस नाईक तुषार मधुकर बैरागी यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार्‍या तक्रारदाराविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपीस मदत करण्यासाठी व न्यायालयात दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी पवार व बैरागी यांनी 13 मे रोजी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने सापळा रचला. बुधवारी पंच व साक्षीदारांसमोर लाचखोर पोलिसांनी तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यामुळे विभागाने दोघांनाही पकडले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी आडगाव पोलिस ठाण्याचे अंमलदार राजेश थेटे यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक झाली आहे.

या घटनेस 24 तास उलटत नाहीत तोच महिला सहायक पोलिस निरीक्षकासह पोलिस अंमलदारास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्‍या काही अधिकारी कर्मचार्‍यांकडून जबाबदारी पार पाडण्याऐवजी लाचखोरीस प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. शहरातील गुन्हेगारी वाढत असताना त्यावर अंकुश ठेवण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याने दुसरीकडे लाच मागून गुन्हेगारांना सूट देणार्‍या पोलिसांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा :

Back to top button