Jasprit Bumrah : बुमराहने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करत बनला पहिला भारतीय गोलंदाज! | पुढारी

Jasprit Bumrah : बुमराहने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करत बनला पहिला भारतीय गोलंदाज!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा उपकर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इतिहास रचला आहे. आयपीएल (IPL 2022)मध्ये बुमराहने मंगळवारी चार षटकात 32 धावा देऊन एक विकेट घेतली. हैदराबादच्या डावातील 20व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने वॉशिंग्टन सुंदरला क्लीन बोल्ड केले. या विकेटसह बुमराहने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

बुमराहने (Jasprit Bumrah) ही विकेट घेतली तेव्हा त्याची पत्नी आणि टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशनही मैदानावर उपस्थित होती. यावेळी टीव्ही स्क्रीनवर संजनाची प्रतिक्रियाही दाखवण्यात आली. यंदाच्या आयपीएल हंगामात बुमराहने 13 सामन्यात एकूण 12 विकेट घेतल्या आहेत आणि तो संघासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे.

टी 20 (T20) क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारा बुमराह (Jasprit Bumrah) पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि लीग क्रिकेटसह एकूण 206 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 21.63 च्या सरासरीने 250 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, बुमराहचा इकोनॉमी 7.02 आहे. 10 धावांत पाच बळी ही त्याची टी-20 मधील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने यंदा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हा विक्रम केला.

वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. भुवीने 223 टी-20 विकेट घेतल्या आहेत. जयदेव उनाडकट 201 विकेट्ससह तिसऱ्या, विनय कुमार 194 विकेट्ससह चौथ्या आणि इरफान पठाण 173 विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. T20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराह हा रविचंद्रन अश्विननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनच्या नावावर T20 मध्ये 274 विकेट्स आहेत. त्याचबरोबर ड्वेन ब्राव्हो 587 विकेट्ससह जागतिक यादीत अव्वल स्थानावर आहे.

बुमराह अशा खेळाडूंपैकी एक आहे जो सतत क्रिकेट खेळत असतो. अशा परिस्थितीत त्याला आयपीएलनंतर होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेत विश्रांती मिळू शकते. बुमराहशिवाय रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत यांनाही विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 193 धावा केल्या. प्रियम गर्गने 26 चेंडूत 42 तर राहुल त्रिपाठीने 44 चेंडूत 76 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ सात गड्यांच्या मोबदल्यात 190 धावाच करू शकला आणि त्यांनी हा सामना अवघ्या 3 धावांनी गमावला. मुंबईसाठी प्रियम गर्गने 26 चेंडूत 42 तर राहुल त्रिपाठीने 44 चेंडूत 76 धावा केल्या. रोहित शर्माने 36 चेंडूत 48 आणि इशान किशनने 34 चेंडूत 43 धावा केल्या. टीम डेव्हिडने 18 चेंडूत 46 धावा केल्या.

Back to top button