नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून परीक्षा रद्द करण्यासारखे निर्णय घ्यावे लागले. या निर्णयानंतर माझ्यावर टीकाही झाली. 'परीक्षा रद्द करणारा मंत्री' असा ठपकाही लावला. परंतु मी परीक्षा रद्द करणारा मंत्री नसून, करिअर कट्ट्यासारख्या विद्यार्थी घडविणार्या उपक्रमाची निर्मिती करणारा मंत्री आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
सपकाळ नॉलेज हब येथे आयोजित केलेल्या करिअर कट्टा बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, तंत्रशिक्षण विभागाचे डी. पी. नाठे, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र सपकाळ, प्राचार्य डॉ. साहेबराव बागल, ठाणे येथील व्हाइस केअरच्या संचालिका डॉ. सोनाली लोहार, सपकाळ नॉलेज हबच्या उपाध्यक्षा कल्याणी सपकाळ उपस्थित होत्या. ना. सामंत म्हणाले की, 'कोरोना काळात विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शिक्षकांनी नुकसान भरून काढण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आधुनिक पद्धतीमुळे वर्गात बसण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता नाही. अशात शिक्षकांनी पुढाकार घेऊन करिअर कट्ट्यासारख्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवायला हवा.
महाविकास आघाडी सरकारने पुण्यात रिसर्च अकॅडमी उभारली आहे. करिअर कट्टा हा उपक्रम व्यापक करायचा असेल तर ही अकॅडमी मोफत उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. न्यू एज्युकेशन पॉलिसीबाबतदेखील त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर प्राध्यापक, प्राचार्य भरतीचा निर्णय घेतला असून, तंत्रज्ञ जागांबाबतही मविआने निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याप्रसंगी करिअर कट्टा बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट विभागीय समन्वयक, उत्कृष्ट जिल्हा समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, विभागीय स्तरावरील बक्षिसे तसेच उत्तेजनार्थ बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रा. सीमा बाजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
देवमाणूस ते राक्षस!
जेव्हा परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी लॅपटॉपवर माझा फोटो लावून त्याची आरती केली. अनेकांनी मला देवमाणूस म्हणून संबोधले. मात्र जेव्हा परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला, तर आता मी विद्यार्थ्यांसाठी राक्षस झालो आहे. कुठेही गेलो तरी परीक्षा ऑनलाइन घ्या, अशा प्रकारचे निवेदने दिली जातात. विशेष म्हणजे यासाठी प्राध्यापकही आग्रही असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मंत्र्यापेक्षा सहसंचालक व्हावं
सहसंचालकांचा किती दबदबा आहे, हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आले. सहसंचालकांच्या नावाचा उल्लेख तीनदा केला. दोनदा त्यांचा सत्कारही केला. त्यांची ही ताकद बघून मंत्र्यापेक्षा सहसंचालक व्हावं असं वाटायला लागलं आहे. तसेच डॉ. रवींद्र सपकाळ यांनी आता सपकाळ हब खासगी विद्यापीठ करावे, जेणेकरून त्यांचा अन् सीईटीचा संबंध राहणार नसल्याची कोपरखळीही ना. उदय सामंत यांनी मारली.