लग्न झाल्याची माहिती लपवून दुसर्‍या लग्नाचा घाट | पुढारी

लग्न झाल्याची माहिती लपवून दुसर्‍या लग्नाचा घाट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पुर्वी लग्न झाल्याची माहिती लपवून दुसरा विवाह करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या नियोजित वरासह त्याच्या भावाविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तसेच 10 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचे नियोजित वधूच्या वडीलांनी फिर्यादीत म्हटले आहे. सुशांत सुहास वराळे (वय 35) व स्वप्निल सुहास वराळे (दोघे रा. सह्याद्री कॉम्प्लेक्स, नागाळा पार्क) अशी संशयितांची नावे आहेत.

सुशांत वराळे याचे एका उच्चशिक्षीत मुलीशी लग्न ठरले होते. 6 फेब्रुवारी 2022 रोजी साखरपुडा होवून 15 मे रोजी त्यांचा लग्नसोहळा होणार होता. दरम्यान, 9 मे रोजी नियोजित वधूच्या वडीलांना एका अनोळखी क्रमांकावरुन फोन सुशांत वराळे याच्या पुर्वी झालेल्या लग्नाचे व्हीडीओ, फोटो मिळाले. त्यांनी याची खातरजमा केली असता त्याचा एका मंदिरात लग्न झाल्याची माहिती समोर आली. संशयित सुशांत वराळे याने ही सर्व माहिती लपविल्याचे उघडझाले.

मुलीच्या वडीलांनी साखरपुडा, दागिने, लग्नसभारंभाचा हॉल यावर 10 लाखांचा खर्च केला असून हे आर्थिक नुकसान करुन तसेच पुर्वीच्या लग्नाची माहिती लपवून फसवणूक केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिसांत दिली. यावरुन सुशांत व त्याचा भाऊ स्वप्निल या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

Back to top button