येवला औद्योगिक वसाहतीत नवउद्योजकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहित करा : ना. भुजबळ | पुढारी

येवला औद्योगिक वसाहतीत नवउद्योजकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहित करा : ना. भुजबळ

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

येवला औद्योगिक वसाहतीमध्ये सर्व पायाभूत सुविधांचा निर्माण करण्यात आलेल्या आहे. या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी औद्योगिक गुंतवणूक होण्यासाठी औद्योगिक वसाहतीत उद्योगांच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत उद्योजकांना माहिती देण्यात यावी व तातडीने भूखंड वाटपाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

येवला तालुक्यातील चिचोंडी येथील औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांची पाहणी व औद्योगिक वसाहत कार्यान्वित करणेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितिन गवळी, तहसिलदार प्रमोद हिले, कार्यकारी अधिकारी जयवंत बोरसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील, उपअभियंता जे.पी. पवार, उमेश पाटील, सागर चौधरी, एस. एस पाटील, उपरचनाकार विजय चौधरी, वरिष्ठ भुमापक जयेश त्रिभूवन, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे उपकार्यकारी अभियंता एम. डी जाधव, पोलीस निरिक्षक भगवान मथुरे, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, या औद्योगिक क्षेत्रात रस्ता, वीज व पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, मोठे उद्योगांना आणण्यासाठी अधिक वाव असल्याने याबाबतची उद्योजकांना माहिती देण्यात यावी. तसेच माहितीसाठी एमआयडीसीचे दिशादर्शक फलक ठिकठिकाणी लावण्यात यावेत. या क्षेत्रातील अंतर्गत रस्ते व सांडपाणी यांची योग्य व्यवस्था करण्यात यावी. झाडे अधिक प्रमाणात लावल्याने या परिसराचा उजाडपणा दूर होवून एक नवरूप या परिसरास येईल. त्यामुळे येवला औद्योगिक क्षेत्र परिसर व अंतर्गत रस्त्यांलगत पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करून सुशोभित करण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या रायते पारेगाव रस्त्याचे विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्यात यावे. अंगणगाव ते चिंचोडी या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्याकडे हस्तांतरीत करून तातडीने पूर्ण करावे अशा सूचना यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपिस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे याठिकाणी उद्योजकांसाठी एमआयडीसीचे सुविधा केंद्र चालू करून येथे कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी असे भुजबळ यांनी सांगितले.

पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, जे इच्छुक शेतकरी आपली जागा देण्यास तयार असतील त्यांच्या जमिनी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येवून त्याचा योग्य मोबदला त्यांना देण्यात यावा. या क्षेत्रात मोठ्या उद्योगांसह, अन्न व फळ प्रक्रिया उद्योग, पैठणी उद्योग व इतर लहान उद्योगही कसे विकसित होतील यादृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे. विंचूर औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा आढावा सुद्धा यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. तसेच स्थानिक शेतकऱ्यांचे निकामी वीज रोहित्र तातडीने बदलवून देण्याच्या सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी पाणीपुरवठा योजना, रस्ते व सांडपाणी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, दळणवळण संलग्नता, अग्निशामक व्यवस्था, भूखंड वाटप याबाबतचा आढावा कार्यकारी अधिकारी जयवंत बोरसे यांनी योवळी सादर केला.

हेही वाचा :

Back to top button