नाशिक : मोहदरी घाटात लक्झरी बसला आग(व्हिडीओ) | पुढारी

नाशिक : मोहदरी घाटात लक्झरी बसला आग(व्हिडीओ)

सिन्नर (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा

नाशिकहून कोल्हापुरकडे निघालेली खासगी लक्झरी बस मोहदरी घाटात काल (दि.13) रात्री 9.40 च्या सुमारास अचानक पेटली, तथापि चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी करुन प्रवाशांना बसमधून उतरविल्याने जीवीत हानी टळली. सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या आग्नीशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझविली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, श्रीहरी दत्तात्रय कुलकर्णी, रा. म्हसरुळ, नाशिक हे खासगी लक्झरी बस (क्र. एमएच 09, पी.बी. 3069) नाशिकहून कोल्हापुरकडे भाविकांना घेऊन जात होते. बसमध्ये अंदाजे 30 ते 35 प्रवाशी होते. नाशिकहून निघालेली बस रात्री 9.40 च्या सुमारास मोहदरी घाटात आली असता, बसला आग लागल्याचे चालक कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करुन प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितले. प्रवाशी बसमधून सुखरुप बाहेर आल्यानंतर कुलकर्णी यांनी सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या आग्नीशामक दलाला तसेच एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर दोन्ही आग्नीशामक बंब तात्काळ घटनास्थळी पोहचले व काही वेळात आग विझविण्यात आली.

चालक कुलकर्णी यांनी प्रसंगावधान दाखविल्याने बसमधील सर्व प्रवासी सुखरुप बचावले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Back to top button