पुणे : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पर्यटकांना विविध जलचर पक्षांचे होणार दर्शन | पुढारी

पुणे : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पर्यटकांना विविध जलचर पक्षांचे होणार दर्शन

पुणे : प्रसाद जगताप उजनी धरणाप्रमाणेच आता पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात असलेल्या तलावात जलचर पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास असणार आहे. आगामी काळात पर्यटकांना येथील तळ्यात फ्लेमिंगो, बदक, बगळा, राजहंस, खंड्या, पाणकोंबडी यांसारखे निसर्गात वावरणारे आणि सतत पाण्याजवळ असणारे पक्षी पहायला मिळणार आहेत.

राजीव गांधी प्राणी संग्रहालय 130 एकर जागेत पसरलेले आहे. त्यापैकी जवळपास 30 एकर जागेत ऐतिहासिक तलाव आहे. याच तलावामध्ये जलचर पक्ष्यांचा अधिवास असावा, याकरिता प्राणिसंग्रहालय प्रशासन प्रयत्न करणार आहे. पाण्यावर आपली उपजिविका भागविणारे आणि सातत्याने पाण्यावर राहणारे पक्षी येथील तलावात आकर्षित होतील आणि इतर ठिकाणांप्रमाणेच राजीव गांधी प्राणी संग्रहालयात देखील पर्यटकांना विविध प्रकारचे जलचर पक्षी पहायला मिळतील, याकरिता आगामी काळात प्राणिसंग्रहालय प्रशासन प्रयत्न करणार आहे.

नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यासाठी या गोष्टी आवश्यक… 

प्राणीसंग्रहालयात जलचर पक्षांना जर आकर्षित करायचे असेल तर प्रशासनाला सुरूवातीला तलावात वाढत असलेली जलपर्णी कायमची काढावी लागणार आहे. तसेच, येथील ऐतिहासिक तलावात अनेक दिवसांपासून साचलेला गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच नैसर्गिक अधिवास असलेले पक्षी येथे आकर्षित होतील आणि पुणेकर पर्यटकांना ते पहायला मिळतील.

सध्या प्राणी संग्रहालयात असलेले प्राणी…

– सस्तन प्राणी – 20 प्रजाती – 262 प्राणी
– सरपटणारे प्राणी- 30 प्रजाती – 157 प्राणी
– पक्षी – 12 प्रजाती -25 पक्षी
– प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या एकूण प्रजाती – 62
– प्राणिसंग्रहालयातील एकूण प्राणी संख्या – 444 

Back to top button