केतकीसारख्या अनेकजणी उच्छादाचा कळस करतात : किरण माने

केतकीसारख्या अनेकजणी उच्छादाचा कळस करतात : किरण माने
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे हिचा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी समाचार घेतला. तिचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. आता अभिनेते किरण माने यांनीही केतकी चितळे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

किरण माने म्हणतात की, "…अशा विकृत लोकांनी खच्चून भरलेल्या क्षेत्रात आम्ही करिअर करतोय. तुम्हाला ही प्रवृत्ती नवीन असेल, आम्ही कित्येक वर्ष भोगतोय. विशेषत: जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद आणि उच्छादाचा कळस करतात", अशा शब्दांत त्यांनी पोस्ट लिहिली आहे.

किरण माने यांची सविस्तर पोस्ट अशी…

आता तुम्हाला सांगू इच्छितो, अशा विकृत लोकांनी खच्चून भरलेल्या क्षेत्रात आम्ही करीयर करतोय. तुम्हाला ही प्रवृत्ती नवीन असेल, आम्ही कित्येक वर्ष भोगतोय. विशेषत: जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद आणि उच्छादाचा कळस करतात. मी स्वत: अशा दोन अभिनेत्रींचा जवळून अनुभव घेतलाय. त्यांच्या उन्मादानं बोलण्याला आपण विरोध केला की 'लेडीज कार्ड' खेळून 'गैरवर्तना'चे खोटे आरोप करतात. माझ्यासमोर एकदा एका अभिनेत्रीने एका थोर महामानवाविषयी अपशब्द वापरले होते. मी तात्काळ विरोध केला. तो राग मनात ठेवून त्या जातवर्चस्ववादी अभिनेत्रीने मनूवादी कलाकारांचा 'गट' जमवला. हळूहळू कुरबूरी सुरू केल्या आणि आणि… असो. बात निकलेगी तो दूssssर तलक जायेगी.

अशा विकृतांच्या अनेक हिडीस घटना, बेताल-बिभत्स वागणे आमच्या अख्ख्या युनिटने पाहिलेले आहे. पण अशा गोष्टी उघड करून कुणा भगिनीच्या चारित्र्यावर चिखलफेक करणं ही आपली संस्कृती नाही. पण त्याचवेळी केवळ आपल्या विरोधी विचारसरणीचे आहेत म्हणून, नेत्यांपासून महामानवांबद्दल त्यांनी केलेले अर्वाच्य, घृणास्पद बोलणे सहन नाही करू शकत. असह्य होऊन आपण बंड करून उठलो, तर त्याच अभिनेत्री नंतर पुरोगामी विचारांच्या नेत्यांचे, खासदारांचे कान भरून 'उलट्या बोंबा' कशा मारतात आणि आपले नेते त्यांची बाजू कशी घेतात, ते ही मी 'याची देही याची डोळा ' पाहिलेय. मी भक्कम आहे. कुणाचा मिंधा नाही. पोटासाठी लाचार होणारा नाही. म्हणून पुरून उरलोय या विकृतांना. बाकी कलाकारांची काय घुसमट होत असेल कोण जाणे? सविस्तर लिहिणार आहे योग्य वेळी.

आधी कुजबूज स्वरूपात अशा वल्गना चालायच्या. गेल्या पाचसहा वर्षांत सेटवर मोठ्या आवाजात उघडपणे सुरू झाल्या. आता पोस्ट करण्यापर्यंत मजल गेली! त्यामुळे ही प्रवृत्ती आता ठेचायची वेळ आली आहे. असो. आज छ. संभाजी महाराज जयंती ! 'बुधभूषण' या ग्रंथात छ. संभाजी महाराज म्हणतात, "आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि घरातला पुरूष घरात नसेल, तर त्या घराचा उंबराही ओलांडू नये." याला म्हणतात संस्कार!

तरीही मनूवाद्यांनी शंभूराजांना महिलांविषयी वर्तनाचे खोटे आरोप ठेवून बदनाम केले. पण काळाच्या ओघात वर्चस्ववाद्यांचे कारस्थान भेदून राजेंचे स्वच्छ, नितळ, निर्मळ चारित्र्य लखलखून वर आले. स्वत: सततच्या लढायांमध्ये गुंतलेले असताना शंभूराजेंनी रायगडाचा मुलकी व्यवहार महाराणी येसूबाईंच्या हाती सोपवला होता. महिलेला पंतप्रधानपद देणारा पहिला राज्यकर्ता! एवढेच नव्हे, तर त्यांनी येसूबाईंची मुद्रा चलनी नाण्यावर छापली होती.. साडेतीनशे वर्षांपूर्वी महिलेला हा सन्मान देणार्‍या महापराक्रमी महापुत्राला विनम्र अभिवादन !!!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news