नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याचे नावच घेत नसल्याने, किचनचे गणित पूर्णत: बिघडले आहे. रशिया-युक्रेन युद्ध तसेच इंडोनेशियात निर्माण झालेल्या पामतेलाच्या किमतीचा परिणाम भारतीय बाजारातील खाद्यतेलांवर होत आहे. नाशिकमध्ये गेल्या तीनच महिन्यांत 15 लिटरच्या खाद्यतेलाच्या डब्यावर तब्बल 350 रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे प्रथमच शेंगदाणा तेलापेक्षा सूर्यफूल तेलाचे दर वाढले असून, ही दरवाढ पुढेही अशीच चालू राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भारत खाद्यतेलाचा जगातील दुसरा मोठा आयात करणारा देश असून, एकूण मागणीच्या 60 टक्के खाद्यतेल आयात केले जाते. यापैकी इंडोनेशिया व मलेशियातून पामतेल तर रशिया, युक्रेन आणि अर्जेंटिना या देशांतून सूर्यफूल तेलाची आयात होते.
यात, रशिया-युक्रेन युद्ध प्रदीर्घ काळ सुरू राहिल्याने सूर्यफूल तेलाची आवक ठप्प झाली आहे. तर पामतेलापैकी 65 टक्के पुरवठा करणार्या इंडोनेशियात 'न भूतो न भविष्यती' तेलटंचाई निर्माण झाली आहे. तेथील नागरिकांना दोन-दोन किलोमीटर रांगा खाद्यतेलासाठी लावाव्या लागत असल्याने तेथील सरकारने पामतेलाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतात हॉटेल, रेस्टॉरंट्स, छोटे स्नॅक्स सेंटर्स येथे तळणासाठी सर्वात जास्त मागणी असलेले पामतेल महागले असून, तेदेखील इतर तेलांच्या किमतीपर्यंत जाऊन भिडले आहे. या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे खाद्यतेलाचे दर जरी भडकल्याचे सांगितले जात आहे.
असे आहेत तेलाचे दर…
सूर्यफूल (फॉर्च्युन)- 2950 रु
शेंगदाणा(फॉर्च्युन) 2850 रु
सोयाबीन(मुरली) 2850 रु
पामतेल 2500 रु