औरंगाबाद : अकबरोद्दीन ओवेसी यांनी घेतले औरंगजेबच्या कबरीचे दर्शन | पुढारी

औरंगाबाद : अकबरोद्दीन ओवेसी यांनी घेतले औरंगजेबच्या कबरीचे दर्शन

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शैक्षणिक संस्थेच्या भूमिपूजनासाठी आलेले एमआयएम नेते आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनी थेट खुलताबाद गाठत औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. तसेच शहरातील सर्वप्रमुख दर्गांसह कबरींचे ओवेसी यांनी दर्शन घेतले. त्यात खुलताबादेतील औरंगजेबच्या कबरीचाही समावेश आहे, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. मात्र यावरून आता एमआयएमवर सर्वच राजकीय पक्षानी टीकेची झोड उठवली आहे.

राजकारणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न : चंद्रकांत खैरे

आम्ही जनतेला एमआयएमचे राजकारण दाखवून देऊ. केवळ वातावरण बिघडवण्यासाठी हे लोक औरंगजेबाच्या कबरीवर गेले. तिथे जायची काहीच गरज नव्हती. इथे येऊन कोणी समाजात तेढ निर्माण करत असेल, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. इम्तियाज जलील चुकून खासदार झाला, त्याने वातावरण खराब करण्याचे काम सुरू केले आहे. खरे सांगायचे तर कोणतेही मुस्लिम औरंगजेबाच्या कबरीवर जात नाहीत, पण इथल्या राजकारणाला धार्मिक रंग देण्यासाठी आज एमआयएमचे लोक तिथे गेले, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमवर टीका केली. औरंगजेबाविषयी एवढाच पुळका आहे, तर मग इम्तियाज यांनी त्यांच्या मुलाचं नाव औरंगजेब का ठेवलं नाही, असा सवालही खैरे यांनी केला.

Back to top button