सोन्याची चमक फिकी?

फाईल फोटो
फाईल फोटो
Published on
Updated on

शेअर बाजार अस्थिर होतो तेव्हा सोन्यात वाढ होते. बाजार वाढतो तेव्हा सोन्यात घसरण होते. परंतु, कोरोना काळात आणि नंतर या दोन्ही स्थितीमध्ये अस्थिरताच पाहावयास मिळत आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा सोन्यात घसरण होते. कारण, गुंतवणूकदार डॉलरमध्ये पैसे टाकतात.

बहुमूल्य सोन्याची चमक ही अलीकडच्या काळात फिकी पडत असल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी याच सोन्याने 55 हजारांची पातळी गाठली होती. तेव्हा सोने 60-70 हजार प्रतितोळ्यापर्यंत जाईल, असे कयास बांधले गेले. त्यामुळे सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले. यामागचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनाची लाट. सोन्याला संकटातील साथीदार म्हणून मानले गेले आहे. युद्ध आणि अन्य स्थितीत सोन्यातून हमखास परतावा मिळतो. म्हणूनच कोरोना काळात सोने चमकले होते. परंतु, आता पुन्हा जुन्याच पातळीवर पोहोचले आहे.

सोन्याने गुंतवणूकदारांना कधीही निराश केलेले नाही. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओत सोन्याचा समावेश करतात. भारतात तर प्राचीन काळापासून मुलीच्या विवाहात सोने देण्याची परंपरा आहे. जेणेकरून तिचे भवितव्य सुरक्षित राहील. दागिन्याचीदेखील जुनीच परंपरा असून त्यामुळे स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते. आजही भारतात जागतिक दर्जाच्या तोडीचे दागिने तयार होतात आणि वापरले जातात. त्यामुळेच भारत सोन्याची सर्वाधिक आयात करतो. आयात बिलाचा मोठा वाटा हा सोने खरेदीच्या रूपातून परदेशात जातो. जागतिक आर्थिक चढ-उतारापासून अर्थव्यवस्था सुरक्षित राहावी, यासाठी जगातील सर्व केंद्रीय बँकांत सोने जमा केले जाते. भारताने ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी बँक ऑफ ब्रिटन आणि बँक ऑफ जपानकडे 46.91 टन सोने गहान ठेवले होते. त्यानुसार भारताला 40 कोटी डॉलर कर्ज मिळाले होते. याच सोन्याने भारताला संकटापासून वाचवले. त्यानंतर डॉ. मनमोहन सरकारने 6.7 अब्ज डॉलरच्या मूल्यांचे 200 टन सोने खरेदी केले. तेच सोने आज भारतासाठी मोठ्या परकी गंगाजळीचा आधार राहिले आहे. जगातील अनेक देश वेळोवेळी अशी कृती करतात. आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेनेदेखील अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अशीच पावले उचलली. जगभरातील केंद्रीय बँका सोने खरेदी करतात तर कधी विकतात. त्याचा परिणाम बाजारावर होतो.
कोरोनाचा धोका टळलेला नाही; परंतु पूर्वीप्रमाणे दहशतही राहिलेली नाही. उद्योग, बाजार ठप्प नाहीत. त्याचा सकारात्मक परिणाम असून सोन्यात घसरण होत आहे. अलीकडे अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुधारणांचे वारे वाहू लागले असून डॉलर, युरो आणि पौंड मजबूत होत आहेत. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा सोन्यात घसरण होते. कारण, गुंतवणूकदार डॉलरमध्ये पैसा टाकतात. दुसरीकडे सरकारी बाँडचा यील्ड म्हणजेच फायदा वाढला आहे. अमेरिकेत ट्रेझरी बाँडमध्ये खूप पैसा टाकला जातो. त्याचा परिणाम म्हणजे सोने घसरत जाते. ताज्या आकडेवारीनुसार सोने 1900 डॉलर प्रति औंसपेक्षा कमी झाले आहे आणि ते जुन्या पातळीवर म्हणजे 1800 डॉलर प्रतिऔंसवर येईल.

सध्या सोने आंतरराष्ट्रीय सट्टेबाजाराच्या रडारवर नाही आणि त्यात ते अधिक गुंतवणूक करताना दिसून येत नाहीत. त्यांचा बहुतांश व्यवहार हा डॉलर आणि सरकारी बाँडवर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याची महागाई पाहता अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह आक्रमक झाली आहे. वाढत्या चलनवाढीमुळे व्याज दरात वाढ करू शकते. त्यांच्या कडक धोरणांचा परिणाम हा सोन्याच्या किमतीवर पडेल आणि त्यात घसरण होईल. याशिवाय चीनकडूनदेखील सोन्याची मोठी खरेदी केली जाते. परंतु, तेथे कोरोनाची लाट असल्याने चिनी नागरिक सोने खरेदीपासून दूर आहेत. परिणामी, सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते, यावर्षीच्या अखेरपर्यंत सोने 1600 डॉलर प्रतिऔसपर्यंत खाली येईल. भारताचा विचार केल्यास सोन्याचे भाव हळूहळू उतरत आहेत. सध्या लग्नसराईचा मोसम आहे. त्यामुळे थोडी तेजी आहे. परंतु, पावसाळा सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण होईल.

– सुचित्रा दिवाकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news