नाशिक : नगरसेवक निधीतील कामांना ब्रेक, रखडलेल्या कामांसाठी पुन्हा वार्‍या | पुढारी

नाशिक : नगरसेवक निधीतील कामांना ब्रेक, रखडलेल्या कामांसाठी पुन्हा वार्‍या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेची आर्थिक स्थिती आणि दायित्वाचा वाढलेला डोंगर पाहता मनपा प्रशासनाने अनेक विकासकामांना पूर्णविराम दिला असून, त्यातून मागील वर्षीच्या नगरसेवक निधीतील कामांना मनपा आयुक्तांनी ब्रेक लावला आहे. ऐन आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच नगरसेवकांच्या कामांना ब्रेक लागल्याने नगरसेवकांच्या महापालिकेतील पुन्हा वार्‍या सुरू झाल्या आहेत.

नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील छोटी-मोठी विकासकामे करता यावीत, यासाठी दरवर्षी नगरसेवकांना नगरसेवक निधी आणि प्रभागविकास निधी दिला जातो. यामुळे नागरी समस्यांशी संबंधित कामे करून नगरसेवकांना नागरिकांपर्यंत पोहोचता येते. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तर जास्तीत-जास्त विकासकामे व्हावीत यासाठी नगरसेवकांनी 2021-22 च्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या नगरसेवक व प्रभाग विकास निधीअंतर्गत अनेक कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीसाठी सादर केले होते. मागील आर्थिक वर्षात नगरसेवक निधीअंतर्गत 12 कोटी 81 लाख तर प्रभाग विकास निधीसाठी 36 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद धरण्यात आले होती. त्यातून नगरसेवक निधीच्या माध्यमातून प्रत्येकाला प्रभागात काम करण्यासाठी प्रत्येकी 10 लाख 50 हजार तर प्रभाग विकास निधीतून प्रत्येक नगरसेवकाच्या वाट्याला 30 लाख रुपयांचा निधी आला होता. यातील बहुतांश कामे मार्च 2022 अखेर मार्गी लागली असली तरी अद्यापही अनेक नगरसेवकांची कामे मार्गी लागलेली नसल्याने संबंधित नगरसेवक मनपात खेटा मारत अधिकार्‍यांच्या भेटीगाठी घेऊन फाइल मंजूर करण्यासाठी आर्जव करीत आहेत.

20 कोटींची कामे थांबविली
मनपा आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रमेश पवार यांनी महापालिकेतील विकासकामांची प्राधान्यक्रम यादी तयार करून कामाची गरज, निधी उपलब्धता या सूत्रांचा वापर करणे सुरू केले आहे. यामुळे अनेक कामांना ब्रेक लागला असून, त्यात नगरसेवक व प्रभाग विकास निधीतील सुमारे 20 कोटींची कामे थांबविण्यात आली आहेत. ब्रेक लावण्यात आलेल्या अनेक कामांमध्ये मळे परिसरातील विकासकामांचा समावेश असल्याने संबंधित नगरसेवकांकडून कामे मंजुरीसाठी पाठपुरावा केला जात आहे. परंतु, आयुक्तांनी संबंधित कामांविषयी चर्चा करूनच निर्णय घेण्यास सांगितल्याने बांधकाम विभागातूनच नगरसेवकांना आल्या पावली माघारी फिरावे लागत आहे.

हेही वाचा :

Back to top button