नाशिक : अपहृत, बेपत्तांचा शोध घेणार ‘निर्भया’, पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश | पुढारी

नाशिक : अपहृत, बेपत्तांचा शोध घेणार ‘निर्भया’, पोलीस आयुक्तांनी दिले 'हे' आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातून अपहृत व बेपत्ता मुलींसह महिलांचा शोध घेण्यासाठी ‘निर्भया’ पथकाला बळकटी देण्याचा निर्णय शहर पोलिस घेत आहेत. तत्कालीन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी निर्भया पथकाची सुरुवात केली होती. मात्र, कालांतराने या पथकाकडे दुर्लक्ष झाले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी या पथकाचा वापर कार्यक्षमतेने करण्याचा निर्णय घेतला आहे.

मातृदिनाच्या औचित्यावर नाईकनवरे यांनी महिला सुरक्षा कक्ष, निर्भया पथकासोबत चर्चा केली. यावेळी निर्भया पथकाला भेडसावणार्‍या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या. निर्भयाच्या चारही पथकांना अधिकाधिक सक्षम करण्याकरिता उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले. पोलिस ठाण्यांच्या मोहिमेसोबत समांतरपणे हरविलेल्या, बेपत्ता व अपहरण झालेल्या बालिका, मुली, महिलांचा शोध घेण्याची जबाबदारीही या पथकाला देण्याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली. अडचणीत असलेल्या महिला, युवतींनी थेट पोलिसांशी संपर्क साधत ‘निर्भया’ची मदत मागावी, असे आवाहनही करण्यात आले.

या पथकातील महिला पोलिस शक्यतो साध्या पोशाखात कर्तव्यावर असतात. या आधी निर्भया पथकाने टवाळखोर, महिलांची छेड काढणार्‍यांवर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार काही प्रकरणांमध्ये गंभीर दखल घेत छेड काढणार्‍यांविरोधात गुन्हेही दाखल केले आहेत. त्यामुळे या पथकाचा वापर पूर्ण कार्यक्षमतेने करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. त्यानुसार शहरातून अपहृत व बेपत्ता मुलींसह महिलांचा शोध घेण्यासाठी निर्भया पथकाचा वापर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा :

Back to top button