पराभवाने नाराज पण, सूर गवसल्याने खूश : जसप्रित बुमराह | पुढारी

पराभवाने नाराज पण, सूर गवसल्याने खूश : जसप्रित बुमराह

मुंबई; वृत्तसंस्था : मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला, याचे वाईट वाटते. मात्र सूर गवसल्याने खूश असल्याचे मत मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याने व्यक्त केले आहे. तसेच बाहेरच्या आवाजाचा आपल्यावर परिणाम होत नाही, असेही त्याने म्हटले आहे. या चॅम्पियन गोलंदाजाने केकेआर संघाविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या. त्याने या सत्रात एकूण 10 विकेट घेतल्या आहेत.

केकेआरविरुद्ध मुंबईला 52 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर बोलताना बुमराहने सांगितले की, आम्ही स्पर्धेची तयारी करतो, तेव्हा आमची एक प्रक्रिया असते. तेव्हा आम्ही परिणामांचा विचार करत नाही. जर तुम्हाला या खेळाची जाण असेल तर नेमके काय होत आहे, हे तुम्हाला माहीत व्हावे. तरीही सूर गवसल्याने मी खूश आहे. बाहेर जोरदार चर्चा सुरू आहे, मात्र त्याचा माझ्यावर तरी काहीच परिणाम होत नाही. कारण, दुसर्‍याच्या विचाराने माझ्या कामगिरीचे मी आकलन करत नाही. त्यामुळे लोक अथवा विशेषज्ञ काय म्हणत आहेत, याचा मी विचार करत नाही.

केकेआरविरुद्धच्या सामन्यात चार षटकांत 10 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेणारा बुमराह पुढे म्हणाला की, हा एक माझ्यासाठी संस्मरणीय क्षण होता. मात्र, सोमवारच्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला, याचे वाईट वाटते. दरम्यान, बुमराहने ट्वीट करून पाच विकेट मिळालेल्या चेंडूच्या फोटोसोबत वरील आशयाची भावूक कॅप्शन दिली आहे.

मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी अजूनही संघाला सूर गवसलेला नसल्याचे मान्य करून जसप्रित बुमराह याने पुढे सांगितले की, आम्ही काही जवळचे विजय मिळवू शकलो नाही. विजयासमीप पोहोचूनही आम्ही तो साकारू शकलो नाही. हा नवा संघ असून, युवा खेळाडू सरावातून चांगले बनत आहेत. आम्ही खडतर परिश्रम केल; पण यावेळी आमच्या पदरी यश पडले नाही. मात्र, उर्वरित 3 सामन्यांत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न मुंबई करेल.

Back to top button