नाशिक : सराफाचे दुकान फोडून चोरी ; 7 तोळे सोने, 2 किलो चांदीवर डल्ला | पुढारी

नाशिक : सराफाचे दुकान फोडून चोरी ; 7 तोळे सोने, 2 किलो चांदीवर डल्ला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पेठरोडवरील सराफाच्या दुकानाचे लोखंडी ग्रिल व शटर उचकटून अज्ञात चोरट्याने तब्बल 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि २ किलो चांदी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी वैभव बबनराव भोसले, (38, रा. मेहरधाम,पंचवटी ) यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठरोडवरील बच्छाव हॉस्पिटलसमोर वैभव भोसले यांचे प्रसिद्धी ज्वेलर्स आहे. रविवारी (दि. ८) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या दुकानाच्या लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडून आणि शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व २ किलो चांदी असा तब्बल ४ लाख पाच हजार रुपये किंमतीचा ऐवज त्याने चोरून नेला.
याप्रकरणी भोसले यांनी पंचवटी पोलिसांत फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक नलवडे, सहायक पोलिस निरीक्षक खैरणार यांनी रविवारी सकाळी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एस. जी. डंबाळे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button