दिंडोरी : धरणांच्या तालुक्यात विहिरींनी गाठला तळ | पुढारी

दिंडोरी : धरणांच्या तालुक्यात विहिरींनी गाठला तळ

दिंडोरी (जि. नाशिक) : समाधान पाटील
तालुक्यात बहुतांश गावांत नळ पाणीपुरवठा योजना असल्याने पाणीटंचाईची तीव्रता जरी कमी असली तरी एप्रिलअखेर वाढत्या उन्हाच्या झळांबरोबरच भूजल पातळी खालावल्याने तीन-चार गावांतील योजनांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे काही खासगी विहिरी अधिग्रहीत कराव्या लागत आहेत.

दिंडोरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या माध्यमातून गाव, पाड्यांवर विविध योजनांच्या माध्यमातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातही यंदा पाऊसही समाधानकारक झाल्याने तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. काही ठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यातच विजेच्या लपंडावाने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडलेले आहे.

एप्रिल, मे मध्ये काही ठिकाणी पाण्याची पातळी कमी होत होणार्‍या संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा बनविण्यात आला असून, त्यास मंजुरी मिळाली आहे. तालुक्यात प्रत्येक गावात पाणीयोजना झालेल्या असल्या तरी काही योजना सदोष झाल्याने व विजेच्या लोडशेडिंगमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सर्व गावात योजना असताना काही गावांत योजना होताना सदोषाचे ग्रहण लागल्याने उन्हाळ्यात विहीर अधिग्रहणाची वेळ येत आहे.

भ्रष्टाचारामुळे कारभार्‍यांवर गुन्हे…

दिंडोरी गवळीपाडा, प्रिंपज, देहरे, चिकाडी या ठिकाणी टंचाई स्थिती आहे. मात्र तालुक्यात इतर गावे, पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची फारशी अडचण नाही. तालुक्यात जलस्वराज्य योजना भारत निर्माण योजना, जलजीवन मिशन आदी पाणीपुरवठा विभागाचे प्रत्येक योजनेचे काम तालुक्यात झाले आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी या योजना पूर्णपणे यशस्वी झालेल्या नाहीत. भारत निर्माण योजनेचा तर बट्ट्याबोळ झालेला असून, यातील भ—ष्टाचारामुळे काही कारभार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत.

योजनेच्या पाइपलाइनला गळती…

अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांना गळती लागली असून, त्या दुरुस्त किंवा नव्याने होण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी पाठवले आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत विविध गावांत कामे प्रस्तावित असून, त्यातील काही कामे मंजूर होऊन सुरू झाली आहेत. तळेगाव वणी व चंडिकापूर येथे विहीर अधिग्रहण करावी लागणार आहे.

लाखोंचा खर्च पाण्यात…

तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मडकीजाम, इंदोरे, जांबुटके येथील योजना लाखो रुपये खर्च करून केल्या आहेत. मात्र, त्या सुरूच झाल्या नसल्याने लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. प्रत्येक गावात पाणीपुरवठा योजनेची कामे झालेली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी त्याला गळती लागली असून, वेळीच दुरुस्तीअभावी महिलांना पाणवठ्यावर जाऊन पाणी आणावे लागते.

विजेचा खेळखंडोबा नित्याचाच…

ग्रामीण भागात विजेचा प्रश्न गंभीर असल्याने पाणीयोजनेवर त्याचाही परिणाम होत आहे. भारनियमन व कमी दाबाने वीजपुरवठा झाल्यास पाणी वितरणात अडचणी येतात. गतवर्षी व यंदाही तालुक्यात टँकरचा एकही प्रस्ताव नाही. गेल्या वर्षी निचाई पाडा व शिवार पाडा येथे विहीर अधिग्रहण करावे लागले होते. यंदा तेथील योजना पूर्ण झाल्याने ती वेळ येणार नाही, असे वाटत असतानाही नीचाई पाडा येथील विहीर आटल्याने खासगी विहीर अधिग्रहण करावी लागली.

हेही वाचा :

Back to top button