कर्नाटक : बनावट नोटा प्रकरणात चौघे अटकेत, एक फरारी | पुढारी

कर्नाटक : बनावट नोटा प्रकरणात चौघे अटकेत, एक फरारी

कारवार : पुढारी वृत्तसेवा: बनावट नोटा वितरित करणार्‍या पाच जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील चौघांना अटक झाली असून मुख्य संशयित आरोपी मुस्ताक हसन बेग (43, रा. कारवार) हा फरारी झाला आहे. कारवार पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्यांमध्ये तिघेजण गोव्याचे आहेत. त्यांच्याकडून 500 रु. मूल्याच्या 26 बनावट नोटा व 40 खर्‍या नोटा जप्‍त केल्या आहेत.

अटक केलेल्या संशयितांमध्ये प्रवीण नायर (वय 43), लॉयड लॉरेन्स स्टेवीस (23, मडगाव, गोवा), लार्सन लुईस सिल्वा (26, पात्रोडा मडगाव, गोवा) प्रणोय फर्नांडिस (30, मडगाव गोवा) यांचा समावेश आहे. मुख्य संशयित मुस्ताक बेग हा फरारी असून त्याचा शोध सुरू आहे.

कारवारच्या जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. सुमना पन्नेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 5 रोजी सायंकाळी शहरात कोडीबाग हॉटेल परिसरात बनावट नोटा देऊन खर्‍या नोटा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे जाऊन छापा टाकला असता उपरोक्‍त सर्वजण सापडले. यावेळी बेग हा पोलिसांच्या तावडीतून निसटून फरारी झाला.

जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याची चर्चा होती. त्यामुळे पोलिसांकडून याचा तपास सुरू होता. यासाठी उपनिरीक्षक प्रेमनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक बनवण्यात आले होते. या पथकाने तपास करत बनावट नोटा चलनात आणणार्‍या टोळीला जेरबंद केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button