नाशिक : 39 भोंग्यांची परवानगी नाकारली, काय आहेत अटी ? | पुढारी

नाशिक : 39 भोंग्यांची परवानगी नाकारली, काय आहेत अटी ?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालेगावमधील 325 धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी दिली आहे. त्यात वेळेची मर्यादा, आवाजाच्या तीव्रतेची मर्यादा हे निकष पाळण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. तर शहरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी अद्याप एकही परवानगी देण्यात आलेली नाही. शहरातील धार्मिक स्थळांकडून भोंगे लावण्यासाठी 60 अर्ज आले होते. त्यापैकी 39 अर्जदारांनी पहाटे पाचच्या अजानची भोंग्यावरून परवानगी मागितली होती. त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करून त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगीचा विषय राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आला आहे. भोंगे लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियमावली आखून दिल्या असून, त्यानुसारच भोंगे वाजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भोंगे लावण्याची परवानगी घेऊन आवाजाच्या क्षमतेची मर्यादित पातळी राखून भोंगे वाजवण्याची परवानगी आहे. भोंग्यावरील आंदोलन सुरू झाल्याने अनेक धार्मिक स्थळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगावमध्ये सुमारे 350 धार्मिक स्थळांवरील भोंग्यासाठी अर्ज आले होते. त्यातील अर्जांची छाननी करून ग्रामीण पोलिसांनी 325 धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी दिली आहे. तर नाशिक शहर पोलिसांकडेही 60 अर्ज आले आहेत. पोलिसांनी छाननी केली असता त्यापैकी 39 अर्जांमध्ये पहाटे पाचची अजान भोंग्यावरून देण्याची मागणी केली होती. त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. तर उर्वरित अर्जांमध्ये बांधकाम, प्रदूषण परवानगी नसल्याच्या त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे शहरात एकाही भोंग्यास परवानगी दिलेली नाही.

अधिकार ठेवले राखून…
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार भोंग्यांना परवानगी दिली जात आहे. अजानच्या 5 ते 15 मिनिटे आधी व नंतर इतरांना भोंगे वाजवता येत नाही. आवाजाची तीव्रता, वेळेचे बंधन पाळून पोलिस ठाणेनिहाय परवानग्या दिल्या आहेत. परवानगी देताना अटी-शर्तींचे पालन न केल्यास त्या रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत.
– सचिन पाटील,
पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

या अटींची पूर्तता आवश्यक
रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत कोणीही भोंगे लावू शकत नाही. शासनाच्या पर्यावरण विभाग मंत्रालयाने दिवसा सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत व रात्रपाळीत रात्री दहा ते सकाळी सहा या वेळी ध्वनी पातळीची मर्यादा दिली आहे. त्यानुसार औद्योगिक क्षेत्रात रात्री 70 डेसिबल, तर दिवसा 75 डेसिबल क्षमतेपर्यंत आवाजाची मर्यादा दिली आहे. व्यावसायिक क्षेत्रात रात्री 55 व दिवसा 65 डेसिबल क्षमतेच्या आवाजाला परवानगी आहे. निवासी क्षेत्रात रात्री 45 व दिवसा 55 डेसिबल व शांतता परिक्षेत्रात रात्री 40 डेसिबल व दिवसा 50 डेसिबल क्षमतेपर्यंत आवाजाची मर्यादा पाळावी लागते. त्याचप्रमाणे अजानच्या पाच मिनिटे अगोदर व नंतर संबंधित धार्मिक स्थळाजवळील परिसरात इतर ठिकाणी भोंगे लावता येत नाही.

हेही वाचा :

Back to top button