नगरशेठ यांचे ‘सुवर्ण सन्मान पदक’ पाहण्याची आज संधी | पुढारी

नगरशेठ यांचे ‘सुवर्ण सन्मान पदक’ पाहण्याची आज संधी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दूरद‍ृष्टीने उभारलेले राधानगरी धरण आज 100 वर्षांनंतरही कोल्हापूरकरांची तहान भागवत आहे. अशा या राधानगरी धरणाच्या बांधणीसाठी मोलाची मदत करणार्‍या झंवर कुटुंबीयांना ‘नगरशेठ’ पदवीसह सुवर्ण पदकाने सन्मान राजर्षी शाहूंनी केला होता. हे पदक पाहण्याची संधी शाहूप्रेमींना राजर्षी शाहू स्मृतिशताब्दीनिमित्त उपलब्ध झाली आहे. शुक्रवारी (दि. 6) सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत भाऊसिंगजी रोडवरील नगरशेठ बिल्डिंग कार्यालयात हे सन्मानपदक पाहाता येणार आहे.

राधानगरी धरणासाठी मदत करणार्‍या झंवर कुटुंबीयांचा राजर्षींनी केला होता सन्मान

मूळचे राजस्थानचे असणार्‍या झंवर कुटुंबीय कोल्हापुरात पारंपरिक सावकारी व्यवसाय करत होते. राधानगरी धरण बांधताना राजर्षी शाहूंनी मदतीसाठीचे जाहीर आवाहन केले होते. त्यावेळी कोल्हापूरकरांचा भविष्यातील पाणीप्रश्‍न मार्गी लागणार असल्याने झंवर कुटुंबीयाने विनाव्याज आर्थिक मदत केली होती. याबद्दल राजर्षी शाहूंनी झंवर कुटुंबीयांचा सन्मान ‘नगरशेठ’ या पदवी आणि सुवर्णपदक देऊन केला होता. हे पदक शाहूप्रेमींना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन मनिष झंवर व कुटुंबीयांनी केले आहे.

Back to top button