राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्ष : जिल्हास्तरीय शालेय प्रश्‍नमंजुषा स्पर्धेचे आयोजन | पुढारी

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्ष : जिल्हास्तरीय शालेय प्रश्‍नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना स्मृती शताब्दीनिमित्त अभिवादन करण्यासाठी दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन व इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशन, ब्रिलियंट स्कूल्स, नरंदे यांच्या संयुक्‍त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय प्रश्‍नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांसाठी स्वतंत्र असून, इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये होणार आहे. प्रत्येक शाळेतून गटनिहाय दोन विद्यार्थ्यांचा एक संघ स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.

स्पर्धेचा पहिला टप्पा तालुकास्तरावर होणार आहे. प्रत्येक तालुक्यातून एक विजेता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यांसह कोल्हापूर व इचलकरंजी शहर या ठिकाणी प्राथमिक फेरी घेण्यात येईल. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, विज्ञान, गणित, भूगोल, चालू घडामोडी हे स्पर्धेचे फेरीनिहाय विषय आहेत. अंतिम फेरीतील सहभागी संघ व जिल्हास्तरीय विजेता व उपविजेता यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहभागी संघातील प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी 31 मेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी 9604565699 या क्रमांकावर व ई-मेल pudhariyouthconnect@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

‘राजर्षी शाहू महाराज’ यांनी खुली केली शिक्षणाची कवाडे

कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्‍तीचे करून राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाची कवाडे खुली केली. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसह सर्वांनाच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्रत्येक जाती-धर्मीयांसाठी उभारलेली बोर्डिंग्ज हे त्यांच्या शैक्षणिक कार्याचे प्रतीक आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची महती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, या हेतूने स्मृती शताब्दी वर्षात या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे.

Back to top button