

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निसर्गाचा समतोल राखला, तरच निरामय आरोग्य लाभेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंन्ट जनरल (नि.) डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत विद्यापीठ परिसरात कुलगुरू यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर संलग्नित महाविद्यालयांतील 750 विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, डॉ. सुबोध मुळगुंद, डॉ. सुशीलकुमार ओझा आदी उपस्थित होते.
डॉ. कानिटकर म्हणाल्या की, पर्यावरण संतुलनासाठी सर्वांनी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. आरोग्य व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या अनुषंगाने पर्यावरण व वृक्षसंवर्धनासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थी व शिक्षक यांच्या मदतीने महाविद्यालय परिसरात राज्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयांत सुमारे 75,000 वृक्षांचे रोपण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. वृक्षारोपणासाठी शहरातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध उद्यानांची निर्मिती
वृक्षारोपण उपक्रमांतर्गत आरोग्य विद्यापीठ परिसरात वृक्षलागवड करताना विशिष्ट पद्धतीने वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये रुची, गंध, श्रवण, दृष्टी व स्पर्श उद्यान असे भाग तयार केले आहेत. या उद्यानांमध्ये फालसा, धामणी, अटरुन, भोकर, शिवण, अॅपल बोर, चारोळी, सीताफळ, पेरू, अंजीर, आंबा, नारळ, चिकू, चिंच, फणस, सुपारी, मरूड शेंग, रामफळ, लिंबू, संत्रे, ड्रॅगन फ्रूट, चेरी, मोसंबी यांसह विविध वृक्षांचा समावेश आहे.