सांगलीत दोन गटांत मारामारी | पुढारी

सांगलीत दोन गटांत मारामारी

सांगली ः पुढारी वृत्तसेवा दुकानासमोर दुचाकी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून मारामारी झाली. यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. गारपीर चौकात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात मारामारीसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आदर्श देवानंद कांबळे (वय 19, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) याने फिर्याद दाखल केली आहे. आदर्शसह त्याचा मित्र जीवन घाडगे, मावसभाऊ राहुल शिंदे हे जखमी आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. नारायण आपटे, कविता आपटे व त्यांच्या दोन नातेवाईक महिला अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहुल घाडगे याचे संशयित आपटे यांच्या बिल्डिंगमध्ये कपड्यांचे दुकान आहे. दुकानासमोर वाहने पार्किंग करण्यावरून राहुल व आपटे यांच्यात वाद आहे. आदर्श कांबळे हा त्याचा भाऊ राहुल शिंदे याला दुचाकीवरून घेऊन कपडे आणण्यासाठी राहुलच्या दुकानात गेला होता. त्याने दुकानासमोर दुचाकी लावल्यानंतर आपटे याने ‘इथे गाडी लावायची नाही’, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली.

यावरुन त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. या वादातून आपटेसह चारही संशयितांनी काठी व फरशीने हल्ला केला. यामध्ये आदर्शसह तिघे जखमी झाले. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला. लोकांनी मोर्ठी गर्दी केली. अर्धा तास मारामारी सुरू होती. विश्रामबाग पोलिसांना याची माहिती मिळताच ते दाखल झाले. रात्री उशिरा आदर्श कांबळे याची फिर्याद घेण्यात आली. त्यानुसार आपटेसह चौघांविरुद्ध मारामारी व ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button