भाजप-सेनेच्या मिलीजुलीतून नाशिक मनपात भ्रष्टाचार, राष्ट्रवादीची ना. पवारांकडे तक्रार | पुढारी

भाजप-सेनेच्या मिलीजुलीतून नाशिक मनपात भ्रष्टाचार, राष्ट्रवादीची ना. पवारांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेत कोरोना महामारीच्या संकटकाळात भाजप आणि शिवसेनेने मिलीजुली करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते गजानन शेलार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केला असून, याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन ना. पवार यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस भवनात झालेल्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत शेलार यांनी अनेक तक्रारी केल्या. भाजपने महापालिकेत अनेक बाबींमध्ये गैरप्रकार केले असून, त्यास शिवसेनेच्याच काही पदाधिकार्‍यांनी सहकार्य केल्याचे सांगत महासभा ऑनलाइन होत असल्याने तक्रारी करता आल्या नसल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले. त्यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेच्या कामकाजाबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी प्रकरण पोहोचविण्यात आले असून, 800 कोटींचे भूसंपादन कसे झाले, याचा छडा लावण्यात येणार असल्याचे नमूद केले.
पुणे, पिंपरी-चिंचवड येथे टीडीआरद्वारे भूसंपादन केले जात असताना नाशिक महापालिकेत मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला गेल्याचे ना. पवार यांनी सांगितले.

सेनेबरोबर आघाडी नकोच
मनपा निवडणुकीसाठी प्रभागरचना करताना शिवसेनेने राष्ट्रवादीला डावलले. शिवसेनेने त्यांच्या सोयीनुसार प्रभाग तयार करून घेतले असून, याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांना साधी विचारणाही कधी झाली नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी आम्हाला विचारले जात नसल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढविल्यास किमान 60 जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या जागांवर शिवसेना हक्क सांगत आहे. त्यामुळे प्रभागरचनांमध्ये डावलणार्‍या पक्षाशी आघाडी नको, अशी भूमिका मांडण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button