

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
आपली सावली कधीच आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. परंतु 6 मे रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 11 सेकंदापासून ते 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत 50 सेकंदापर्यंत स्वत:ची सावली अदृश्य होणार आहे, खगोलशास्त्रातील घटनेनुसार शून्य सावली दिवस (झिरो शॅडो) असणार आहे.
कर्कवृत्त व मकर वृत्तांमध्ये राहणार्या लोकांना वर्षातून दोन वेळेस तर कर्कवृत्त, मकरवृत्त व विषुववृत्त या ठिकाणी राहणार्यांना वर्षातून एकदाच शून्य सावली दिवसाचा आनंद घेता येतो. कर्कवृत्ताच्या वरच्या भागात व मकरवृत्ताच्या खालच्या भागात राहणार्या लोकांना मात्र शून्य सावली दिवसाचा आनंद घेता येत नाही.
कर्कवृत्त व विषुववृत्त या दोन स्थानांमध्ये सूर्याची किरणे ज्यावेळी 16.74 डिग्री नॉर्थ रेखांवृत्तावर पडतील, त्यावेळी या ठिकाणी असणार्या जागांवर काही सेकंदाकरिता आपली सावली काही ठरावीक वेळी काही सेकंदाकरिता अदृश्य होते. कोल्हापूर हे एक त्यापैकी असणार्या जागेवर येत असल्याने सूर्याच्या उत्तरायान कालखंडात 6 मे रोजी सावली अदृश्य झाल्याचे अनुभता येणार आहे. या काळात सावधान स्थितीत उभे राहून अथवा जागेवर उडी मारून पहिले तर आपली सावली दिसणार नाही, अशी माहिती विवेकानंद महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र व खगोल शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली.