प्रत्येक गावात सिंचनाचे पाणी : ना. जयंत पाटील | पुढारी

प्रत्येक गावात सिंचनाचे पाणी : ना. जयंत पाटील

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सिंचन योजनांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील सर्व गावांत पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतलेला आहे. त्यासाठी 3 हजार 858 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे सुमारे 1 लाख 18 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, अशी माहिती जलसंपदा व पालक मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यातील 64 गावांसाठी 6 एमसी पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे 40 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. टेंभू योजनेतून वंचित असलेल्या 109 गावात 8 टीएमसी पाणी उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढील काळात जिल्ह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. ताकारी म्हैसाळ योजनेवर बंदिस्त पाईपद्वारे चाळीस गावांत पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे दहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी 180 कोटी रुपये खर्च प्रस्तावित असून त्याची कामे प्रगतिपथावर आहेत.

पाटील म्हणाले, म्हैसाळ येथे मोठा बंधारा बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बंधार्‍याचा उपयोग पूर नियंत्रण करण्यासाठी होणार आहे. त्याशिवाय या बंधार्‍यात सतत पाणी राहिल्याने जास्तीत- जास्त दिवस सिंचन योजनांचे पंप चालू ठेवता येणार आहेत. दुष्काळी भागात पाणी देण्यास सुलभ होणार आहे. आरग-बेडग या योजनेतून अकराशे हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. त्यासाठी वीस कोटी रुपये खर्चाच्या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. ताकारी-दुधारी योजना वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष, भवानीनगर, किल्ले मच्छिंद्रगड या परिसरातील गावांना उपयुक्‍त ठरणार आहे. त्यामुळे 750 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. कृष्णा कॅनॉलच्या लायनिंगचे कामही धरण्यात आलेले आहे. सुमारे 86 किलोमीटरचे काम करण्यात येणार आहे.

वाकुर्डे टप्पा क्रमांक दोनचे काम केल्याने 15 हजार 707 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी 3.35 टीएमसी पाणी उचलण्यात येणार आहे. वाळवा तालुक्यातील वीस गावे यामुळे सिंचनाखाली येणार आहेत. यापुढे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज असणार नाही. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना करण्यासंदर्भात लवादाची बंदी आहे. त्यामुळे सध्या हा विषय प्रलंबित आहे.

पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरटीडीएस स्टेशन

पाटील म्हणाले, पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आर. टी. डी. एस. स्टेशन उभारण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी पडल्यानंतर त्याची नदीत पाणी पातळी किती होईल. पूर येईल का, हे तत्काळ लक्षात येणार आहे. सांगलीत पूर संरक्षक भिंत उभारण्यात संदर्भात अभ्यास सुरू आहे.

Back to top button