मुंबई ; पुढारी वृतसेवा : सीबीएसई दहावीची परीक्षा 24 मेपर्यंत तर आयसीएसई बोर्डाची 23 मेपर्यंत सुरू राहणार असल्याने, या बोर्डांचे निकाल लांबणीवर पडतील, यामुळे या बोर्डांच्या अकरावी प्रवेश (11th admission) प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा यंदा दोन सत्रांत होत आहेत. 26 एप्रिलपासून दुसर्या सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या असून सुमारे महिनाभर या परीक्षा पार पडणार आहेत. परीक्षा झाल्यानंतर निकालासाठी किमान महिनाभराचा काळ लागण्याची शक्यता आहे.
यंदा बोर्डाला प्रथम आणि द्वितीय सत्रातील परीक्षेचे गुण एकत्र करून निकाल तयार करायचा आहे. त्यामुळे या केंद्रीय बोर्डांचा निकाल जाहीर होईपर्यंत अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. राज्य मंडळाच्या एसएससी बोर्डाचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता अगोदरच राज्य मंडळाने वर्तवली आहे.
यंदा प्रवेश वेळेत व्हावे यासाठी शिक्षण संचालनालयाने मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिले आहे. असे असले तरी सर्व बोर्डाचे निकाल जाहीर होईपर्यंत प्रवेश थांबतील अशी शक्यता आहे. सर्वच बोडार्ंच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार अकरावीत प्रवेश द्यावा लागतो यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईपर्यंत प्रवेशप्रक्रिया थांबविणे किंवा वेगळ्या पर्यायावर विचार शिक्षण विभागाला करावा लागणार आहे.
बुधवारपासून सराव (11th admission)
अकरावीचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव 4 मेपासून करता येणार आहे. दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांसाठी मॉक डेमो नोंदणीला सुरूवात होईल. ही सुविधा 14 मेपर्यंत असणार आहे.