‘वोक्हार्ट’ विरोधात फसवणुकीचा गुन्हा | पुढारी

‘वोक्हार्ट’ विरोधात फसवणुकीचा गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना बाधितास औषधांची गरज नसताना आर्थिक फायद्यासाठी वेगवेगळी औषधे देऊन निष्काळजीपणे बाधितावर उपचार केले व बाधिताच्या नातलगांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तसेच बाधिताच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वोक्हार्ट रुग्णालयाच्या प्रतिनिधीसह सुदर्शना पाटील यांच्याविरोधात अपहार, फसवणूक, रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल प्रकाश बोराडे (31, रा. दामोदरनगर, पंचक, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार 12 ते 28 ऑगस्ट 2020 दरम्यान वडाळा नाका येथील वोक्हार्ट रुग्णालयात त्यांचे वडील प्रकाश दामोदर बोराडे (62) हे कोरोना बाधित असल्याने उपचार घेत होते. त्यावेळी वोक्हार्ट रुग्णालय प्रशासनाच्या अधिकृत प्रतिनिधीसह सुदर्शना पाटील (रा. वाणी हाउस, वडाळा नाकाजवळ) यांनी संगनमत करून राहुल बोराडे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या वडिलांना औषधांची गरज नसताना स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वेगवेगळ्या औषधांचे डोस देत निष्काळजीपणे उपचार केले. त्याचप्रमाणे प्रकाश बोराडे यांना जे औषधोपचार केले नाही त्याचेही बिल लावून आर्थिक फसवणूक केली. दरम्यान, प्रकाश बोराडे यांचा मृत्यू झाला. त्यावेळी मेडिकल बिलापोटी संशयितांनी इन्शुरन्स कंपनीकडून पाच लाख, राहुल बोराडे यांच्याकडून चार लाख रुपये ऑनलाइन व रोख स्वरूपात घेत फसवणूक केली.

याबाबत राहुल बोराडे यांनी न्यायालयात धाव घेत संशयितांविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार न्यायालयाने मुंबई नाका पोलिसांना याबाबत अपहार, फसवणूक, मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस तपास करीत आहेत.

बिलात खोटी नोंद
राहुल यांच्या फिर्यादीनुसार संशयितांनी उपचारासाठी प्लाझ्माची आवश्यकता आहे असे सांगितले. त्यानुसार राहुल यांनी दोन प्लाझ्मा बॅग उपलब्ध करून दिल्या. मात्र, संशयितांनी प्रकाश बोराडे यांना प्लाझ्मा दिल्याची खोटी नोंद करून प्रति बॅग 30 हजार असे एकूण 60 हजार रुपयांचा उल्लेख मेडिकल बिलात करून फसवणूक केली.

हेही वाचा :

Back to top button