मनसेसोबत युती नको!
मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या जागा कमी करण्याच्या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्यासाठी भाजपचे काही नेते प्रयत्नशील आहेत. मात्र, मनसेसोबत युती केल्यास उत्तर भारतीय मतांवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे युती नको, असा सूर भाजपमधील उत्तर भारतीय नेत्यांमध्ये उमटत आहे.
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करत गेल्या काही दिवसांपासून भाजपने शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मराठी मतांची विभागणी होण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्यासोबत घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या मुंबईतीलच नाहीतर दिल्लीतील काही नेत्यांनी याबाबत खुद्द राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याचेही समजते.
राज ठाकरे हे सुरुवातीपासून भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांचे मित्र आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता असतानाही अनेकदा शेलार व राज यांच्या भेटी झाल्या. एवढेच नाहीतर युतीच्या काळात महापालिका मुख्यालयात प्रश्न घेऊन येणारे राज ठाकरे दुपारचे जेवण शेलार यांच्यासोबतच घेत असत. त्यामुळे मनसेसोबत युतीबाबत प्राथमिक चर्चा करण्याची जबाबदारी शेलार यांच्याकडे असल्याचे समजते. मात्र भाजप व मनसे नेते युतीबाबत उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.
भाजपसोबत मनसेची युती होईल, याची पक्की खात्री भाजपातील उत्तर भारतीय नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांनी युती होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नेहमीच उत्तर भारतीयांच्या विरोधात राहिलेल्या राज ठाकरे यांच्या पक्षासोबत युती झाल्यास उत्तर भारतीय मतदार दुखावले जातील, अशी तक्रारच मुंबईतील उत्तर भारतीय नेत्यांनी थेट भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडे केल्याचे समजते. मुंबईतील भाजपाच्या मराठी नेत्यांना मनसेसोबत युती हवी असताना, उत्तर भारतीय नेत्यांच्या विरोधामुळे युतीबाबत अद्यापपर्यंत कोणताच निर्णय झालेला नाही. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनीही युतीबाबत घाई नको, असा सल्ला मुंबई भाजपातील नेत्यांना दिला असल्याचे समजते.
उत्तर भारतीय मते भाजपचीच..
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-मनसे युतीबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही. याबाबत भाजपच्या नेत्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही. उत्तर भारतीय मते ही भाजपचीच असून त्यात कधीच विभागणी होणार नसल्याचे भाजपचे उत्तर भारतीय नेते आमदार राजहंस सिंह यांनी स्पष्ट केले.
उत्तर भारतीय मते एकगठ्ठा
मुंबईत 35 टक्केपेक्षा जास्त मराठी मतदार आहेत. तर, उत्तर भारतीय मतदारांची संख्या सुमारे 28 ते 30 टक्के इतकी आहे. 35 टक्के मराठी मतदारांची शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी विभागणी होते. मात्र मागील मुंबई महापालिका व विधानसभेची निवडणूक बघता उत्तर भारतीय मतांची फारशी विभागणी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मते मुंबई महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आणू शकतात, असे उत्तर भारतीय नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजप आता मनसेसोबत युती करणार की, प्रत्येक प्रभागात मनसेचे उमेदवार उभे करून मराठी मतांची विभागणी करणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

