नाशिक : देवळाली गावातील क्रेडिट सोसायटीत 46 लाखांचा अपहार | पुढारी

नाशिक : देवळाली गावातील क्रेडिट सोसायटीत 46 लाखांचा अपहार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

देवळाली गावातील सिद्धेश्वर क्रेडीट सोसायटीत काही वर्षांपूर्वी ठेवीदारांच्या नावाने बोगस कागदपत्रे बनवून त्यावर कर्ज उचलून 46 लाख 25 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी सोसायटीच्या संचालक तसेच व्यवस्थापकास सह उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपहार प्रकरणी राजेश पंडितराव गायकवाड यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, संशयित आरोपी रमाकांत विश्वंभर दंडणे राहणार लिंगायत कॉलनी देवळाली गाव नाशिकरोड यांच्यासह सोसायटीमधील संचालक व इतरांनी सहकारी संस्थाचे उपनिबंधक यांनी केलेल्या पोटनियम व सहकार आयुक्तांच्या परिपत्रकानुसार मंजूर कर्ज मर्यादेपेक्षा जास्त रकमेची कर्ज कर्जदारास देताना कर्जदारांकडून सुरक्षित तारण घेणे बंधनकारक आहे. असे असताना सुद्धा संबंधित संचालक व व्यवस्थापकांनी नागरी क्षेत्राबाहेरील आस्थापनेवरील कर्ज दारांना कर्ज दिले तसेच संचालक व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांच्या नावाने बोगस कागदपत्रे बनवून त्यावर ठेवीदारांच्या सह्या घेतल्या तसे ठेवीदारांच्या नावावर स्वतःच्या फायद्यासाठी बोगस कर्ज रक्कम उचलून तेरा लाख 41 हजार चारशे रुपयांचा अपहार केला.

त्याचप्रमाणे कर्जाची रक्कम कर्जदारांकडून वसुल करण्याची जबाबदारी असतानासुद्धा कर्जदारांकडून 32 लाख 82 हजार 833 व कर्जावरील व्याजाची रक्कम वसूल न करता त्यातील संगनमताने संस्थेचा 46 लाख 25 हजार 233 रुपयांचा अपहार करून संगनमताने संस्थेचा व संस्थेच्या सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास घात करून फसवणूक केली. हा प्रकार 1 एप्रिल 1995 ते दिनांक 31 मार्च 2008 या कालावधीत देवळाली गाव येथे कार्यरत असलेल्या सिद्धेश्वर को ऑपरेटिव्ह सोसायटीत घडला असेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे करत आहे. दरम्यान गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नाशिक रोड परिसरातील अनेक नामवंत व्यक्तींचा समावेश आहे.

हेही वाचा :

Back to top button