वैभववाडी, कणकवली पाठोपाठ कुडाळात चोरट्यांचा धुडगूस! | पुढारी

वैभववाडी, कणकवली पाठोपाठ कुडाळात चोरट्यांचा धुडगूस!

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच आहे. कणकवली वैभववाडी तालुक्यापाठोपाठ आता चोरट्यांनी कुडाळ तालुक्याला लक्ष्य केले आहे. अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री कुडाळ शहरात धुडगूस घालत भरवस्तीतील ५ फ्लॅट, चाळीतील ३ खोल्या आणि एक दुकान फोडले. तर पावशीमधील १ दुकान, पणदूरतिठा येथील मेडिकल स्टोअर आणि खासगी दवाखाना फोडून चोरीचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. या घटनेत सुमारे ५० हजार रूपयांची रोख रक्कम, एक सोन्याची साखळी, एक मोटरसायकल असा सुमारे ६८ हजारांचा ऐवज लंपास केला.

भरवस्तीत चोरट्यांनी धुमाकुळ घालत चोरीचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्तीत वाढ करूनही पोलिसांना गुंगारा देत चोरट्यांनी बंद फ्लॅट, घरे व दुकाने लक्ष करीत पोलिसांनाच आव्हान दिले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या पेट्रोलिंगवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात कणकवली, वैभववाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना उघडकीस आल्या. या वाढत्या चोरींच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले असूनही अद्याप चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. सऱ्हाईत चोरट्यांची टोळी असून बंद फ्लॅट, घरे तसेच दुकाने चोराकडून लक्ष्य केली जात आहेत. शनिवारी रात्री कुडाळ शहरासह पावशी व पणदूरतिठा बाजारपेठेत चोरट्यांनी धुमाकुळ घातला.

रविवारी सकाळी या चोरीच्या घटना निदर्शनास आल्या. कुडाळ शहरातील पानबाजार येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेच्या तळमजल्यावरील चप्पल विक्रीच्या दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पानबाजार येथीलच नाडकर्णी चाळीतील तीन बंद खोल्यांचा कडी कोयंडा चोरट्यांनी तोडून आत प्रवेश करीत चोरीचा प्रयत्न केला. या खोल्यांमधील साहित्य विस्कटून टाकले. मात्र यात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. लक्ष्मीवाडी येथील वक्रतुंड काॅम्पलेक्स मधील चार बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले. या फ्लॅटचे कडी कोयंडे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यातील दोन फ्लॅट मधील कपाटातील साहित्य विस्कटून टाकले. एका फ्लॅट मधील रोख दोन हजार रूपये आणि तीन हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी असा एकूण ५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

उर्वरीत दोन फ्लॅट मध्ये चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. तसेच भागीरथी काॅम्पलेक्स मधील एक बंद फ्लॅट चोरट्यांनी लक्ष करीत दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याने त्यांचा प्रयत्न फसला. याच काॅम्पलेक्स खाली उभी करून ठेवण्यात आलेली १५ हजार रूपये किंमतीची एक जुनी शाईन मोटरसायकल चोरीस गेली. या घटनेची फिर्याद आसिफ कादर मेमन (रा.कोलगाव निरूखेवाडी, ता.सावंतवाडी) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.

मुंबई-गोवा महामार्गालगतचे पावशी येथील विघ्नहर्ता जनरल स्टोअर्स चोरट्यांनी लक्ष केले. या दुकानाचे शटर उचकटून काऊंटरधील ८ हजार रूपये रोख रक्कम लंपास केली. तसेच पणदूरतिठा येथील चोरगे काॅम्पलेक्स मधील मे.नारायण मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स आणि त्यालगत असलेले डॉ.पांडुरंग साईल यांचे साईल क्लिनिक चोरट्यांनी लक्ष केले. मेडिकल व दवाखान्याचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मेडिकल मधील काऊंटरच्या ड्रॉव्हर मधील रोख ४० हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले. क्लिनिक मध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या घटनेची फिर्याद मेडिकलचे मालक भिवाजी जगन्नाथ सावंत (रा.डिगस टेंबवाडी) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे.

अज्ञात चोरट्यांविरूद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहीती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी भेट दिली. पोलीस हेड कॉनस्टेबल महेश अरवारी व योगिता राणे यांनी पंचनामा केला. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी शिंदे करीत आहेत. दरम्यान चोरटे शहरातील एका सीसीटिव्हि कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Back to top button