सुखापुरी : पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील तलावाशेजारी असणाऱ्या सांडव्याजवळ माधव दत्तु फाटक (वय २६) याचा मृतदेह आढळला. ही घटना गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी (दि. २८) संध्याकाळी माधव घरी परतला नाही. आई – वडील आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. बरेचसे प्रयत्न करूनही त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शुक्रवारी रात्री गोंदी पोलीस ठाण्यात माधव बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी दाखल केली.
सुखापुरी येथील तलावाशेजारी असणाऱ्या सांडव्याजवळ मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांना दिसून आले. नागरिकांनी सुखापुरी येथील पोलीस पाटील इलियास बागवान यांना माहिती दिली. गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार व्ही. एन. वाघमारे व सहकारी यांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह माधवचा असल्याचे स्पष्ट झाले.खिशात सापडलेल्या मोबाईल सीडीआरसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गोदी पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास व्ही. एन वाघमारे करीत आहेत.
हेही वाचलंत का ?