चंद्रपूर : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मार्निंग वॉकला गेलेल्या दोन जिवलग मित्रांना एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.२८) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. हा अपघात राजूरा आदीलाबाद महामार्गावर घडला. धनराज मालेकर (वय३४) व शेखर ढवस (वय ३३ दोघे रा. खिर्डी) असे मृतांचे नाव आहे.

कोरपना तालुक्यातील कोरपना ते गडचांदूर मार्गावरील खिर्डी या गावातील तरूण पहाटेपासून फिरायला जातात. खिर्डी येथील दोन जिवलग मित्र धनराज मालेकर व शेखर ढवस हे नेहमीप्रमाणे या मार्गाने मॉर्निंग वॉकला गुरुवारी गेले होते. सकाळी साडेपाच्या सुमारास इंजापूर फाट्याजवळ आले असता एका अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक देत चिरडून टाकले. अज्ञातवाहन धारक अपघातानंतर पळूल गेला. याच मार्गाने मॉर्निंग वॉकला जात असलेल्या काही लोकांना अपघाताच घडल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु अपघात एवढा भिषण होता की दोघेही मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

राजुरा-आदीलाबाद महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होते. भरधाव वेगाने वाहने चालविली जातात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावेळी अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. घटनास्थळावर चक्काजाम आंदोलन केले. अज्ञात वाहनाचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी लावून धरली. तब्बल तीन तास वाहतूक थांबलेली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. रास्तारोका करण्यात आल्याने पोलिसांनी घटनास्थळी येऊन मध्यस्थी केली. अपघातग्रस्त वाहनाला शोधून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने कुटूंबिय व गावकरी यांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले. दोघेही जिवलगमित्र अपघातात मृत्यूमुखी पडल्याने खिर्डी गावात शोककळा पसरली आहे.

Back to top button