सातारा : ‘आत सत्कार; बाहेर निदर्शने’ | पुढारी

सातारा : ‘आत सत्कार; बाहेर निदर्शने’

वडूज : पुढारी वृत्तसेवा
प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने 2014 ते 2022 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार वडूज येथील प्राथमिक शिक्षक बँकेत आयोजित करण्यात आला होता. परंतु, या सत्कार समारंभावेळी शिक्षक समितीच्या पदाधिकार्‍यांचा अपमान केल्याचा आरोप करत खटाव तालुका शिक्षक समितीने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावेळी त्यांनी बँकेच्या बाहेर प्रचंड घोषणाबाजी केली.

झालेल्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी माहिती देताना प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक चंद्रकांत मोरे म्हणाले, येणारी बँक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बँकेच्या पैशातून सेवानिवृत्त सभासदांच्या सत्काराचा कार्यक्रम करण्याचा घाट शिक्षक संघाने घातला. या कार्यक्रमासाठी खटाव तालुक्यात शिक्षक समितीचा एक संचालक असताना त्यांना कोणत्याही प्रकारे विश्‍वासात घेतले नाही. गेल्या सात वर्षेत सत्तेवर राहून सत्ताधार्‍यांनी बँकेच्या पैशातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करून स्वतः च्या संघटनेचा प्रचार करण्याबरोबर बँकेचा वापर खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे करून तिचा गैरवापर केला आहे. सभासदांच्या पैशाची लूट करणार्‍या व मनमानी कारभार करणार्‍या कारभाराचा खटाव तालुका शिक्षक समिती जाहीर निषेध करत असून लवकरच समितीच्यावतीने सेवानिवृत्त सभासदांचा स्वतंत्र सत्कार घेण्यात येईल, असे जाधव म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष विश्‍वंभर रणनवरे, सरचिटणीस नवनाथ जाधव, जिल्हा प्रतिनिधी दिलीप पवार यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

Back to top button