आयपीएल : सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणार्‍यांत तिघा भारतीय दिग्गजांचा समावेश

आयपीएल : सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणार्‍यांत तिघा भारतीय दिग्गजांचा समावेश

मुंबई ; वृत्तसंस्था : आयपीएल म्हणजे मनोरंजनाचा खजिना. यंदाच्या आयपीएल हंगामाला सुरुवात होऊन महिना उलटला आहे. षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडणार्‍या या स्पर्धेत गोलंदाजांनीही अफलातून कामगिरी केली आहे. गोलंदाजांच्या भेदक मार्‍यापुढे फलंदाजांनी नांग्या टाकल्या आहेत. पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पाडणारे फलंदाज मधल्या षटकात सावध पवित्रा घेत धावा करण्याचा प्रयत्न करतात. अशामध्ये डॉट बॉलचे (निर्धाव चेंडू) प्रमाण जास्त असते. आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक डॉट बॉल टाकणार्‍या पाच गोलंदाजांचा विचार केला तर या यादीत भारताच्या तीन दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे.

हरभजन सिंग

भारताचा अव्वल दर्जाचा फिरकीपटू हरभजन सिंग याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेतली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल फेकण्याचा विक्रम हरभजनच्या नावावर आहे. भज्जीने आयपीएलमध्ये 160 डावांत गोलंदाजी केली असून त्यामध्ये 1268 डॉट बॉल टाकले आहेत. भज्जीच्या नावावर 150 बळी आहेत आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याने सर्वाधिक सामने खेळले आहेत.

भुवनेश्वर कुमार

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू फेकणारा दुसरा गोलंदाज आहे. मध्यंतरी काही काळ दुखापतीशी सामना करणार्‍या भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीवर याचा परिणाम झाला आहे. भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत 132 सामन्यांत 1267 निर्धाव चेंडू फेकले आहेत. याखेरीज आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 151 बळीदेखील आहेत.

रविचंद्रन अश्विन

या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन. त्याने 164 सामन्यांत 1265 निर्धाव चेंडू फेकले आहेत. याखेरीज आयपीएलमध्ये अश्विनने 152 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या दोन हंगामांत अश्विनने पंजाब संघाचे कर्णधारपदही भूषवले होते.

सुनील नारायण

वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नारायण या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. नारायणची गोलंदाजी आजही फलंदाजाला सहसा कळत नाही. नारायणच्या चेंडूवर मोठा फटका मारणे फलंदाजांना सहजासहजी शक्य होत नाही. नारायणने 134 सामन्यांत 1249 डॉट बॉल टाकले आहेत. आयपीएलमध्ये नारायणच्या नावावर 149 बळी असून कोलकाताच्या यशात त्याने नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे.

लसिथ मलिंगा

क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त झालेला लसिथ मलिंगा प्रामुख्याने यॉर्कर किंग म्हणून ओळखला जातो. श्रीलंकेचा हा क्रिकेटपटू या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. मलिंगाने 122 सामन्यांत 1155 डॉट बॉल टाकले असून त्याच्या नावावर 170 बळी आहेत. मलिंगाने आयपीएलमध्ये एकदा पाच तर सहा वेळा चार बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news